
Maharashtra Kesari 2023 | Sikandar Shaik News
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपली असली तरी पै. सिकंदर शेखच्या कुस्तीवरुन सुरु झालेला वाद अद्याप कायम आहे. १४ जानेवारी रोजी माती विभागातील अंतिम कुस्ती सामन्यात सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली होती. मात्र या लढतीत पंचांकडून सिंकदर शेखवर पक्षपात झाल्याचा आल्याचा आरोप राज्यभरातून होत आहे. सोशल मीडियावरही यावरुन प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
हा वाद कायम असतानाच सिकंदरच्या वडिलांनीही या कुस्तीवरुन खंत बोलून दाखविली आहे. तसंच सिकंदरच्या आई आणि आणि वस्ताद यांनीही त्यांचं मत व्यक्त केलं आहे. सिकंदर शेखचे वस्ताद शफी शेख यांनी आपला पट्टा हा अवल असल्याचं सांगत केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील कोणत्याही मल्लाने त्याला हरवून दाखवावं, असं खुलं चॅलेंज केलं आहे.
महाराष्ट्र केसरीची कुस्ती माझ्या सिकंदरनेच मारली होती. परंतु केवळ पंचांनी चुकीच्या पद्धतीने समोरच्या पैलवानाला पॉइंट दिल्याने वर्षभर कष्ट करून माझ्या लेकराच्या तोंडचा घास काढून घेतला. माझ्याच नाही तर कुणाच्याच पोरावर असा अन्याय होऊ नये, अशी खंत सिकंदर यांचे वडील रशीद शेख यांनी व्यक्त केली.
आयुष्यभर कष्ट करून घरात पैलवान तयार केला आणि ऐन वेळी फडात अशा पद्धतीने निर्णय होत असतील तर पैलवान बनवण्यात काय अर्थ, असा उद्विग्न सवालही यावेळी रशीद शेख यांनी विचारला. यावेळी त्यांना त्यांचे अश्रू आवरता आले नाहीत. यावेळी सिकंदर शेखची आई मुमताज शेख यांनीही त्यांच्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
तर केवळ पंचाच्या चुकीमुळे आयुष्यभर पाठीवर ओझं वाहून रक्ताचं पाणी करून बापानं तयार केलेल्या सिकंदर शेखला महाराष्ट्र केसरीला मुकावं लागलं. अशा पैलवानांना अशा प्रसंगाला तोंड देण्याची वेळ येऊ नये म्हणून नव्याने महाराष्ट्र केसरी फेडरेशनच तयार करणार असून निर्विवाद स्पर्धा होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून नवीन महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी दिली.
१४ जानेवारी रोजी माती विभागातील अंतिम कुस्ती सामन्यात सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली होती. यावेळी महेंद्र गायकवाड याने सिकंदरला बाहेरील टांग हा डाव टाकला. पण तो परफेक्ट नव्हता असं काहींचं म्हणणं आहे. त्यावरूनच वादही सुरू झाला आहे. सिकंदर धोकादायक पोजिशनला नव्हता तरी महेंद्रला चार गुण कसे दिले गेले? असा प्रश्न विचारला जात आहे.