
मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात नो-बॉलवरुन झालेला राडा आणि त्यानंतर दिल्लीचे प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी मैदानात येऊन पंचांशी घातलेली हुज्जत हा विषय सध्या चांगलाच गाजतो आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल प्रवीण अमरे यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली असून कॅप्टन ऋषभ पंतचंही 100 टक्के मानधन कापून घेण्यात आलं आहे. या घटनेनंतर आयपीएल चाहत्यांना दोन वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच पद्धतीच्या एका ड्राम्याची आठवण झाली.
2019 साली जयपूरमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना सुरु होता. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 18 धावांची गरज असताना बेन स्टोक्सने टाकलेला बॉल...नो-बॉल देण्यास पंचांनी नकार दिला होता. ज्यामुळे संतापलेल्या महेंद्रसिंह धोनीने मैदानात येऊन अंपायर्सशी हुज्जत घातली होती.
2019 मध्ये झालेल्या सामन्यात अखेरची ओव्हर टाकणाऱ्या बेन स्टोक्सने पहिल्या तीन बॉलमध्ये फक्त सहा रन दिल्या होत्या. पुढच्या तीन बॉलमध्ये 8 धावांची गरज असताना बेन स्टोक्सने टाकलेला फुलटॉस बॉल नो-बॉल न दिल्यामुळे मैदानात मोठा राडा झाला होता.
दिल्ली विरुद्ध राजस्थान या सामन्यात मुंबईतही असाच प्रकार पहायला मिळाला. राजस्थानच्या मकॉयने टाकलेला फुलटॉस बॉल कमरेच्या वर जात असल्याचं म्हणत दिल्लीने नो-बॉल जाहीर करण्याची मागणी केली होती. परंतू अंपायर्सनी हा नो-बॉल न जाहीर केल्यामुळे प्रवीण अमरेंनी मैदानात येत हुज्जत घातली. अखेरीस राजस्थानने हा सामना जिंकला आणि बेशिस्त वर्तनासाठी प्रवीण अमरेंवर एक सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींग यांच्या परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तो सध्या विलगीकरणात आहे. अशावेळी राजस्थानविरुद्ध सामन्यात प्रवीण अमरे संघाला मार्गदर्शन करत होते.