SA vs IND : दुसऱ्या डावात भारताकडे ७० धावांची आघाडी, सलामीवीरांची हाराकिरी

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह चमकला, घेतले ५ बळी
SA vs IND : दुसऱ्या डावात भारताकडे ७० धावांची आघाडी, सलामीवीरांची हाराकिरी
फोटो सौजन्य - ICC

केप टाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने भारताची पडझड रोखत संघाला ७० धावांची आघाडी मिळवून दिली आहे. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांत संपवल्यानंतर भारताला १३ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. परंतू दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केल्यानंतर भारताच्या सलामीवीरांना माघारी धाडण्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आलं. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल माघारी गेल्यानंतर कोहली आणि पुजारा यांनी डाव सावरत दुसऱ्या दिवसाअखेरीस ५७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

त्याआधी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या दिवशी आपलं वर्चस्व मिळवण्यात यश मिळवलं. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर गारद झाला आणि भारताने पहिल्या डावात १३ धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात बुमराहने ज्या मैदानात केली, त्याच मैदानावर बुमराहने ५ विकेट घेत आफ्रिकेला दणका दिला आहे.

पहिल्या दिवसाअखेरीस दक्षिण आफ्रिकेने १ विकेट गमावत १७ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाही भारतीय गोलंदाजांनी एडन मार्क्रम आणि नाईट वॉटचमन केशव महाराजचा अडसर दूर केला. परंतू यानंतर रासी व्हॅन डर डसेन आणि केगन पिटरसन जोडीने चांगली भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना झुंजवलं. दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करत आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

किगन पिटरसनने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत सुरेख फटके खेळले. दुसऱ्या सत्रात उमेश यादवने डसेनचा अडसर दूर करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. यानंतर मैदानात आलेल्या टेंबा बावुमानेही पिटरसनला उत्तम साथ दिली. या दोघांनीही ४७ धावांची भागीदारी करत आफ्रिकेचं पारडं सामन्यात जड केलं. यादरम्यान केगन पिटरसनने आपलं अर्धशतक पूर्ण करत भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. मोहम्मद शमीने टेंबा बावुमा आणि वर्नेनला एकाच ओव्हरमध्ये माघारी धाडत आफ्रिकेला दुहेरी धक्के दिले.

यानंतर अखेरच्या फळीतही आफ्रिकेकडून कगिसो रडाबा आणि ऑलिव्हर यांनी छोटेखानी भागीदारी करत भारतीय धावसंख्येच्या जवळ पोहचण्याचा प्रयत्न केला. परंतू बुमराहने त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडत पहिल्या डावात भारताला १३ धावांची नाममात्र आघाडी मिळेल याची काळजी घेतली. भारताकडून जसप्रीत बुमराहने ५, शमी आणि उमेश यादवने प्रत्येकी २-२ तर शार्दुल ठाकूरने १ विकेट घेतली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in