
Sourav Ganguli ने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि उत्तम बॅट्समन राहिलेल्या या खेळाडूने आता आपण नवी इनिंग सुरू करणार असल्याचं ट्विट करून जाहीर केलं आहे. सौरवने ट्विट करत ही माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी सौरव गांगुलीच्या घरी अमित शाह यांनी डिनर घेतलं होतं. त्यानंतर घडलेली ही घडामोड महत्त्वाची ठरली आहे. सौरव गांगुली आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सौरव गांगुलीने एक ट्विट केलं आहे त्यात त्याने असं म्हटलं आहे की मी आता नवी सुरूवात करतो आहे. मला अपेक्षा आहे की लोक माझं त्यावेळीही स्वागत करतील. माझ्या आयुष्यातला हा नवा अध्याय आहे असं म्हणत त्याने हे ट्विट केलं आहे. त्याच्या या ट्विटची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याचप्रमाणे तो राजीनामा देणार असल्याचीही चर्चा चांगलीच रंगली आहे.
मात्र सौरव गांगुलीने राजीनामा दिलेला नाही असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं आहे. एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत जय शाह यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे दादाने बीसीसीआय सोडलेलं नाही हे तर तूर्तास नक्की झालं आहे. मात्र त्याच्या आयुष्यात येणारा नवा अध्याय काय आहे याची उत्सुकता ताणली गेली आहे हे मात्र नक्की
गांगुलीने नेमकं काय म्हटलं आहे?
"मी १९९२ पासून क्रिकेटर म्हणून माझी कारकीर्द सुरू केली होती. २०२२ मध्ये या गोष्टीला ३० वर्षे होत आहेत. या संपूर्ण काळात मला क्रिकेटने खूप काही दिले. सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे लोकांकडून मिळालेलं प्रेम आणि पाठिंबा. आज मी ज्या स्थानावर आहे तो माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि मला पाठिंबा देणाऱ्या लोकांमुळेच. मी आज त्या सगळ्यांचे आभार मानू इच्छितो. तसंच मी आता एक नवा अध्याय सुरू करतो आहे ज्याद्वारे मी लोकांना मोठ्या प्रमाणात मदत करू शकेन. मला आशा आहे की लोक मला असाच पाठिंबा देतील."
सौरव गांगुलीने जे ट्विट केलं आहे त्यावरून खरंतर काहीही नीट स्पष्ट होत नाही. कारण बीसीसीआयचं अध्यक्षपद मी सोडतोय असं त्याने कुठेही म्हटलेलं नाही. मात्र तो राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आणि खास करून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.