
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) नवजात मुलाचे निधन झाले आहे. रोनाल्डोने 18 एप्रिल रोजी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार) ट्विट करून ही माहिती दिली आहे. रोनाल्डो आणि त्याची पत्नी जॉर्जिना यांनी संयुक्त निवेदनाद्वारे या दुर्दैवी घटनेची माहिती दिली आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डोने आपल्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, 'आमच्या नवजात मुलाचे (Baby Boy) निधन झाल्याचे अत्यंत दुःखाने कळवावे लागत आहे. हे सर्वात मोठे दुःख आहे जे पालकांना सहन करावे लागते. पण आमच्या मुलीचा जन्म आम्हाला बळ देत आहे तसेच हे दु:ख सहन करण्याची ताकद देत आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि परिचारिकांचे आम्ही आभारी आहोत.'
'या घटनेमुळे आम्ही पूर्णपणे निराश झालो असून आम्ही आवाहन करत आहोत की, कृपया या कठीण काळात आमच्या खासगी आयुष्याचा थोडासा विचार केला जावा.' असंही रोनाल्डोने म्हटलं आहे. 'आमचा मुलगा आमचा देवदूत होता, आम्ही त्याच्यावर कायम प्रेम करू.' असं म्हणत रोनाल्डोने आपल्या दु:खाला वाट मोकळी करुन दिली आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची जोडीदार जॉर्जिना यांनी ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की, ते जुळ्या मुलांचे पालक होणार आहेत. दोघांनी हॉस्पिटलमधील एक फोटोही शेअर केला आहे. या दोन मुलांच्या प्रसूतीवेळी मुलाचा मृत्यू झाला आहे, तर मुलगी सुखरूप आहे.
जेव्हा क्रिस्टियानो रोनाल्डो हा रियल माद्रिद क्लबसाठी खेळत होता, तेव्हा म्हणजे 2016 साली त्याची जॉर्जिनासोबत ओळख झाली होती. जॉर्जिना ही एका गुच्ची स्टोअरमध्ये काम करत होती. इथेच या दोघांची ओळख झाली होती. तेव्हापासून दोघेही रिलेशनशीपमध्ये आहेत. मात्र, असं असलं तरीही रोनाल्डोने अद्याप जॉर्जिनासोबत लग्न केलेले नाही.
पण तरीही तो 4 मुलांचा बाप आहे. रोनाल्डो वयाच्या 25 व्या वर्षी पहिल्यांदा वडील झाला, 2010 मध्ये त्याला ज्युनियर रोनाल्डो नावाचा मुलगा झाला. यानंतर, तो 2017 मध्ये जुळ्या मुलांचा (1 मुलगा आणि 1 मुलगी) पिता झाला. यानंतर त्याला जॉर्जिनापासून अलाना मार्टिना ही मुलगी आहे.