Ind vs WI : ‘एक हजारी’ सामन्यात भारताचा एकतर्फी विजय, विंडीजवर सहा विकेटने मात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेची दणक्यात सुरुवात केली आहे. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात आपला १ हजारावा सामना खेळणाऱ्या भारताने वेस्ट इंडिजवर पहिल्या वन-डेत ६ विकेट राखून मात केली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने विंडीजने विजयासाठी दिलेलं १७७ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं.

ADVERTISEMENT

टॉस जिंकून रोहित शर्माने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळत झाली. मोहम्मद सिराजने शाई होपला स्वस्तात माघारी धाडलं. यानंतर विंडीजच्या डावाला गळती लागली. मधल्या फळीपर्यंत एकही फलंदाज विंडीजच्या संघासाठी भागीदारी करु शकला नाही. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे एका क्षणाला वेस्ट इंडिजची अवस्था ७ बाद ७९ अशी झाली होती.

यानंतर जेसन होल्डर आणि फॅबिअन अॅलनने आठव्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी रचत विंडीजचा डाव सावरला. होल्डरने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. दोघांनीही आठव्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचून संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. जेसन होल्डरने ७१ बॉलमध्ये ४ षटकार लगावत ५७ धावा केल्या. यानंतर विंडीजचे तळातले फलंदाज फार तग धरु शकले नाहीत आणि १७६ धावांवर विंडीजचा डाव संपुष्टात आला. भारताकडून युजवेंद्र चहलने ४, वॉशिंग्टन सुंदरने ३, प्रसिध कृष्णाने २ तर मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली.

हे वाचलं का?

प्रत्युत्तरादाखल भारताने फलंदाजीत दमदार सुरुवात केली. दुखापतीमधून सावरलेल्या रोहित शर्माने इशान किशनसोबत पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. सलामीची जोडी भारताला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच अल्झारी जोसेफने त्याला आऊट केलं. रोहितने ५१ बॉलमध्ये १० चौकार आणि १ षटकार लगावत ६० धावा केल्या. यानंतर मैदानावर आलेला विराट कोहलीही फारकाळ तग धरु शकला नाही, जोसेफने त्याला ८ धावांवर बाद केलं.

यानंतर इशान किशनने ऋषभ पंतच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत स्कोअरबोर्डवर शंभरीचा टप्पा ओलांडला. परंतू इशान किशन आणि ऋषभ पंत लागोपाठ माघारी परतल्यामुळे भारत बॅकफूटला ढकलला गेला. परंतू सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडाने यानंतर संघाची पडझड रोखत संघाला विजय मिळवून दिला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT