Ind vs Eng 3rd Test : टीम इंडियाची दाणादाण, ७८ रन्सवर पहिला डाव संपुष्टात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लॉर्ड्स कसोटीत आक्रमक खेळ करुन इंग्लंडला १५१ रन्सने पराभवाचा धक्का दिलेल्या भारतीय संघाची तिसऱ्या कसोटी सामन्यात पुरती दाणादाण उडाली आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत संपवण्यात इंग्लंडला यश आलं आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही.

ADVERTISEMENT

टॉस जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिले बॅटींगचा निर्णय घेतला. दुसरा कसोटी सामना जिंकल्यामुळे भारताने आपल्या संघात कोणतेही बदल केले नाहीत. परंतू या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. लॉर्ड्स कसोटीत शतक झळकावणारा लोकेश राहुल जेम्स अँडरसनच्या पहिल्याच ओव्हरवर शून्यावर आऊट झाला. यानंतर ठराविक अंतराने अँडरसनने चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीलाही आपल्या जाळ्यात अडकवलं. ३ बाद २१ अशा परिस्थितीत अडकलेल्या भारतीय संघाला यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकरांनी सावरलं.

दोन्ही फलंदाजांनी मैदानावर जम बसवण्याचा प्रयत्न करुन छोटेखानी भागीदारी रचली. बिनीचे शिलेदार माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने मैदानावर संयम दाखवून भारताला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतू रॉबिन्सनने अजिंक्य रहाणेला आऊट करत भारताच्या अडचणी आणखी वाढवल्या. दुसऱ्या सत्रातही भारताची ही घसरगुंडी अशीच सुरु राहिली. ऋषभ पंत माघारी परतल्यानंतर इतके तास संयम दाखवणाऱ्या रोहितचाही तोल ढळला आणि त्याने ओव्हर्टनच्या बॉलिंगवर खराब फटका खेळत आपली विकेट फेकली. रोहितने १९ तर अजिंक्य रहाणेने १८ धावा केल्या.

हे वाचलं का?

यानंतर भारताचे उर्वरित फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. एकामागोमाग एक पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा भारताचा उर्वरित डाव ७८ धावांवर संपला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हर्टन यांनी प्रत्येकी ३-३ तर रॉबिन्सन आणि करन यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT