IPL 2022 : अमरावतीकर जितेश शर्मावर पंजाब किंग्सची बोली, २० लाखांची रक्कम मोजत घेतलं संघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या पहिल्या दिवसाच्या लिलावात सर्व संघमालकांनी भारतीय खेळाडूंना खरेदी करण्यात रस दाखवला. अनेक खेळाडूंनी पहिल्या दिवशी १० कोटींच्या बोलीचा टप्पा ओलांडला तर अनेक स्थानिक खेळाडू बेस प्राईजवर काही संघांमध्ये दाखल झाले. ज्यात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे महाराष्ट्रातील अमरावतीचा जितेश शर्मा. जितेशला पंजाब किंग्ज संघाने २० लाखांची बोली लावत आपल्या संघात घेतलं आहे.

ADVERTISEMENT

कोण आहे जितेश शर्मा?

जितेश शर्मा हा यष्टीरक्षक फलंदाज असून स्थानिक क्रिकेटमध्ये तो विदर्भाचं प्रतिनिधीत्व करतो. २०१६ साली त्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं, परंतू त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. २०२२ सालच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत जितेश शर्माने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली होती. ज्यात त्याने ८ सामन्यांमध्ये ५३.५० च्या सरासरीने २१४ धावा केल्या होत्या. जितेशचा स्ट्राईक रेटही २३५.१६ चा आहे. जितेशच्या धडाकेबाज कामगिरीमुळेच विदर्भाचा संघ मुश्ताक अली स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचला होता, परंतू या सामन्यात त्यांना कर्नाटककडून हार पत्करावी लागली होती.

हे वाचलं का?

IPL 2022 Auction: ‘या’ खेळाडूंवर लक्ष्मी झाली प्रसन्न; 10 कोटींपेक्षाही जास्त लागली बोली

जितेशने सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात २० चेंडूत ६ षटकार आणि २ चौकार लगावत ५४ धावा केल्या होत्या. जितेश शर्माची टी-२० क्रिकेटमधली आकडेवारीही तितकीच कौतुकास्पद आहे. आतापर्यंत विदर्भाकडून खेळलेल्या ५४ सामन्यांमध्ये जितेशने २८.२७ च्या सरासरीने १३२९ धावा केल्या आहेत. यात जितेशने ८ अर्धशतकं आणि एक शतक लगावलं आहे. मैदानात जितेश शर्मा आपल्या चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो, विशेषकरुन षटकार खेचणं ही त्याची खासियत मानली जाते. याच कारणासाठी पंजाबने जितेश शर्मावर बोली लावल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

जितेश शर्माचा जन्म अमरावतीमधला. चामोर्शी रोडवरील आडगाव भागात जितेश शर्मा आपल्या परिवारासोबत राहतो. लहानपणापासून क्रिकेटचा छंद असल्यामुळे जितेशने याच खेळात आपलं करिअर करायचं ठरवलं. शिक्षण पूर्ण करत त्याने विदर्भाकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली. पंजाबच्या संघाने जितेश शर्मावर बोली लावल्यानंतर मुंबई तक ने त्याच्याशी संपर्क साधला. “माझ्यासाठी हा सर्वात आनंदाचा क्षण होता. या हंगामात मी चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे माझ्यावर कोणीतरी बोली लावेल हा मला विश्वास होता. पंजाबने बोली लावल्यानंतर आई-बाबांसह नातेवाईकही चांगलेच खुश असल्याचं”, जितेश शर्मा म्हणाला. त्यामुळे जितेशला यंदा पंजाबच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

IPL 2022 : तब्बल ३ कोटी खर्च करुन मुंबईने खरेदी केला ‘Baby AB’ आहे तरी कोण? जाणून घ्या…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT