
मुंबईकर सूर्यकुमार यादवने काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघात पदार्पण केलं आहे. फार कमी कालावधीत सूर्यकुमारने स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारा सूर्यकुमार आजही अनेक क्रिकेटप्रेमींना लक्षात राहतो तो म्हणजे RCB विरुद्ध सामन्यात विराट कोहलीसोबत त्याच्या रंगलेल्या द्वंद्वामुळे.
या गोष्टीला आता बराच काळ उलटून गेला आहे. ब्रेकफास्ट विथ चँपिअन या कार्यक्रमात बोलत असताना सूर्यकुमार यादवने त्या प्रकरणावर भाष्य करत, आपण त्यावेळी मनातून घाबरलेलो होतो हे कबुल केलं.
"त्या सामन्यात विराट कोहलीचं स्लेजिंग एका वेगळ्याच लेव्हलवरचं होतं. मी त्यावेळी फक्त हीच गोष्ट डोक्यात ठेवून खेळत होतो की काहीही झालं तरी मला एकही शब्द न बोलता संघाला हा सामना जिंकवून द्यायचा आहे. विराट ज्यावेळी माझ्याकडे चालून आला त्यावेळी मी आतून घाबरलो होतो. मी च्युईंग गम चघळत होतो, परंतू माझं हृदय आतून धडधडत होतं. एक आवाज सारखं आतून मला सांगत होता की काहीही झालं तरी एक शब्दही बोलू नकोस. हा फक्त 10 सेकंदांचा मुद्दा आहे, यानंतर दुसरी ओव्हर सुरु होईल. मी त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर कसलेही भाव जाणवू दिले नाहीत.
त्याक्षणी माझी बॅट ग्राऊंडवर पडल्यामुळे मी कोहलीसोबत चाललेली ती नजरानजर थांबवली. यानंतर संपूर्ण वेळ मी कोहलीकडे बघितलंही नाही, असं सूर्यकुमारने स्पष्ट केलं. यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादव सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नव्हता. यंदा मुंबईचा संघ आपले सुरुवातीचे सहाही सामने हरला आहे. परंतू त्यातही सूर्यकुमारने आपली चमक दाखवून दिली.