Tokyo Olympics 2020 : ५ वर्षांच्या तपश्चर्येचं हे फळ, खरी हिरो मीराबाईच !

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. रौप्य पदकाची कमाई करत मीराबाईने २०१६ मध्ये हुकलेल्या संधीचं यशात रुपांतर केलं. मीराबाईच्या या यशात अनेकांना वाटा आहे. तिच्यासोबत काम करणारे प्रशिक्षक, फिजीओथेरपिस्ट, तिच्या आहाराची काळजी घेणारे न्यूट्रीशिअन अशा सर्व जणांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ भारताला टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी मिळालं.

मीराबाईचे हात बळकट करण्यात मोलाची भूमिका बजावली ती म्हणजे तिच्यासोबत काम करणारे फिजीओथेरपिस्ट आलाप जावडेकर यांनी. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या छोट्याश्या शहरातून आलेल्या आलाप जावडेकर हे गेल्या काही महिन्यांपासून मीराबाईसोबत फिजीओ म्हणून काम करत आहेत. यानिमीत्ताने मीराबाईने घेतलेली मेहनत, तिच्या फिटनेसमागची कहाणी याबद्दल ‘मुंबई तक’ने आलाप जावडेकर यांच्याशी संवाद साधला.

१) सर्वात पहिले तुमचं अभिनंदन, तुमच्या प्रोफेशनबद्दल जाणून घ्यायला आवडेल. फिजीओथेरपीकडे तुम्ही कसे वळलात?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

– माझं लहानपण हे बदलापूरात गेलं. घरात वैद्यकीय क्षेत्राचं बॅकग्राऊंड होतं. माझे वडील बालरोग तज्ज्ञ आहेत आणि आई शल्यचिकीत्सक म्हणून काम करते. त्यामुळे आई-बाबांच्या क्षेत्रात काम करायचं हे मी ठरवलं होतं. परंतू याचसोबत खेळ, गाणं हे देखील माझे आवडीचे विषय आहेत. त्यामुळे २४ तास एकाच ठिकाणी बांधून रहायचं नव्हतं. लहानपणी क्रिकेटची मॅच पाहताना, सचिन तेंडुलकर इंज्युअर्ड झाला की एक माणूस बॅग घेऊन यायचा आणि त्याच्यावर उपचार करायचा. त्यावेळपासूनच मला याबद्दल कुतुहल निर्माण झालं. या क्षेत्रात काम करायचं ठरवल्यावर Advance Courses इकडे उपलब्ध नव्हते. २०१२ मध्ये फिजीओथेरपीमध्ये ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी ऑस्ट्रेलियात जाऊन याचं शिक्षण घेतलं…आणि नंतर तिकडूनच फिजीओथेरपीस्ट म्हणून माझी सुरुवात झाली. सुरुवातीला आपण घेतलेल्या शिक्षणाचा अंदाज आणि प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून ऑस्ट्रेलियात काही फुटबॉल क्लबमध्येही मी काम केलं.

२) Olympic Gold Quest संस्थेशी तुम्ही निगडीत आहात, या संस्थेच्या कामकाजाबद्दल थोडंसं सांगाल?

ADVERTISEMENT

– भारतात ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारे खेळाडू तयार करायचे हे या संस्थेचं उद्दीष्ट आहे, ही एका प्रकारे NGO आहे. प्रकाश पदुकोण, गीत सेठी यासारख्या दिग्गज खेळाडूंनी ही संस्था उभारली आहे. विरेन रस्किन्हासारखे अनुभवी खेळाडू या संस्थेशी जोडले गेले आहेत. खेळाडूंच्या फिटनेस लेवलपासून त्यांचा आहार ते त्यांना सरावात मदत करण्याचं काम ही संस्था करते. मी काहीसा अपघातानेच या संस्थेशी जोडलो गेलो. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियातलं माझं काम सोडून मी थेट पटीयालात बॉक्सिंगच्या नॅशनल कँपमध्ये जॉईन झालो. तिकडे भारतीय बॉक्सर्सच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचं माझं काम होतं.

ADVERTISEMENT

यानंतर गेल्या पाच वर्षांपासून मी भारताचे बॉक्सर्स, तिरंदाज, नेमबाज यांच्यासोबत काम करतो आहे. २०१७ पासून मीराबाई या संस्थेशी जोडली गेली आहे. परंतू सुरुवातीला आम्ही तिला बाहेरुन सपोर्ट करायचो. सुरुवातीच्या काळात तिचं ट्रेनिंग हे नॅशनल कोच आणि फिजीओंच्या देखरेखीखाली व्हायचं. परंतू जानेवारी महिन्यात तिच्या फिजीओना आपलं काम काही कारणांमुळे सोडावं लागलं, यानंतर त्यांनी माझं नाव सुचवलं आणि जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान मी मीराबाईसोबत कामाला सुरुवात केली.

३) २०१६ मध्ये संधी हुकल्यानंतर मीराबाईने केलेलं कमॅबक हे कौतुकास्पद आहे. वेटलिफ्टींग हा खेळ किती आव्हानात्मक आहे?

– २०१६ मध्ये मीराबाईची हुकलेली संधी हा तिच्यासाठी लर्निंग एक्सपिरीअन्स होता. परंतू यानंतरही तिने कमबॅक केलं. वेटलिफ्टींगमध्ये तुम्ही एका पद्धतीने तुमच्या शरीराला आव्हान देत असता. या खेळात खेळाडू इंज्युअर्ड होण्याची जास्त शक्यता असते. एखादं वजन उचलताना स्नायूंवर आणि जॉईंट्सवर गरजेपेक्षा जास्त भार येऊ नये यासाठी एका विशिष्ट पद्धतीने हा सराव करावा लागतो. प्रत्येक खेळाडूसाठी सरावाची वेगवेगळी पद्धत फिजीओला डिजाईन करावी लागते. ज्याच्यात दररोजचा व्यायाम आणि तितकाच सराव हे देखील महत्वाचे फॅक्टर्स आहेत. खेळाडूंना या सरावादरम्यान इंज्युरी होऊ द्यायची नाही हे आमचं काम असतं.

४) भारताच्या ईशान्येकडून येणारे खेळाडू हे शाररिक तंदुरुस्तीच्या तुलनेत उजवे असतात असं दिसून आलंय, मीराबाईच्या निमीत्ताने ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय. फिजीओ म्हणून तुमचं मत काय आहे?

– आपल्याला थेट असं म्हणता येणार नाही, पण यात काही प्रमाणात तथ्य आहे असं म्हणता येईल. विशेषकरुन मेरी कोमपासून जे खेळाडू त्या भागातून येत आहेत आणि त्यांचा जडणघडण ज्या पद्धतीने होते आहे त्यामुळे असं म्हणायला वाव आहे. परंतू याचा अर्थ असाही घेता येणार नाही की इतर राज्यांचे खेळाडू हे इशान्येकडच्या खेळाडूंपेक्षा कमी तंदुरुस्त असतात. ही गोष्ट प्रत्येक खेळाडूच्या शरीरावर अवलंबून असते. यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यावा लागलीत. मीराबाई लहानपणी आपल्या भावासोबत लाकडं गोळा करायला जायची. वयाच्या १२ व्या वर्षी तिच्या भावाला जे जमायचं नाही ती लाकडाची मोळी मीराबाई सहज उचलायची.

याचाच अर्थ वयाच्या १२ व्या वर्षी ती लाकडाची मोळी कशा पद्धतीने सहज उचलली जाऊ शकते ही पद्धत तिच्या शरिराला कळली होती. आपली शरीर एखादी प्रक्रीया सहज करु शकतंय हे कळल्यानंतर मीराबाईने वेटलिफ्टींगच्या खेळासाठी सराव करुन, मेहनत घेऊन इथपर्यंत प्रवास केला आहे. त्यामुळे ही गोष्ट देखील नजरेआड करुन चालता येणार नाही. खेळाडू म्हणून तुम्हाला ही गोष्ट कळली की पुढच्या गोष्टी सरावाने होत राहतात.

५) एखाद्या खेळाडूने पदक मिळवलं पण त्यामागची मेहनत ही लोकांपर्यंत पोहचत नाही. अनेक अदृष्य हात मदतीसाठी असतात. या पाच वर्षांच्या काळात मीराबाईचा सराव कसा चालायचा?

– याचं उत्तर द्यायला गेलं तर मी असं म्हणेन की मीराबाई हीच खरी हिरो आहे, तिचा सपोर्ट स्टाफ नाही. मी काय किंवा इतरही कोणी असो…आम्ही असलो किंवा नसलो तरीही तिचा सराव सुरुच राहिला असता. तिच्यासारख्या खेळाडूसोबत काम करायला मिळणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. मीराबाईचं पदक हे पाच वर्षांची तपश्चर्या आहे. मी जेव्हापासून तिच्यासोबत काम करतोय, तेव्हापासून मी तिला सराव सोडता इतर कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रीत करताना पाहिलेलं नाही.

रात्री पावणे दहा वाजता तीचा फोन बंद असायचा, दहा वाजता ती झोपून जायची. सकाळी उठल्यानंतर न्यूट्रिशीअनने ठरवून दिलेला ब्रेकफास्ट झाला की सरावाला सुरुवात व्हायची. या सरावादरम्यानही तिचा दिनक्रम ठरला होता. देवाची प्रार्थना झाली की सरावाला सुरुवात करायची. या सरावादरम्यानही ती फारशी बोलायची नाही. सरावादरम्यान काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील तरच त्याबद्दल संवाद व्हायचा. सराव संपल्यानंतर दुपारचं जेवण, मग थोडा आराम…परत सराव आणि रात्रीचं जेवण झालं की झोप हा क्रम ती गेली ५ वर्ष नित्यनेमाने फॉलो करते आहे. मध्यंतरी पाठीच्या दुखण्यामुळे मीराबाईवर अमेरिकेत उपचार झाले, त्यावेळेलाही तिने आपल्या डाएट प्लानमध्ये बदल केला नव्हता.

६) मीराबाईसोबत तुम्ही जेवढा वेळ घालवलवात, त्यावरुन तुम्ही नवीन खेळाडूंना फिटनेसच्या दृष्टीकोनातून काय सल्ला द्याल?

– सध्याच्या घडीला तुम्ही कोणताही खेळ खेळा, फिटनेस हा सर्वात महत्वाचा भाग आहे. हॉकीमध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघाने केलेली कामगिरी हे फिटनेस खेळात महत्वाचा का आहे याचं उत्तम उदाहरण आहे. पाच वर्षांपूर्वी भारताचा हॉकी संघ आणि आताचा हॉकी संघ पाहिला की तुम्हाला कळेल. तुम्ही शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं आणि जो खेळ तुम्हाला खेळायचा आहे त्यासाठी तुम्ही तंदुरुस्त असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

तुम्ही बॅडमिंटनसाठी फिट राहून हॉकी खेळू शकणार नाहीत. जर तुम्ही फिट नसाल तर तुम्ही सर्वात आधी थकून जाणार आहेत. हे एखाद्या इंजिनासारखं आहे. ज्या खेळाडूचं इंजिन हे जास्त काळ सुरु राहिलं तो खेळाडू बाजी मारेल. तुम्ही तांत्रिक दृष्ट्या कितीही चांगले खेळाडू असाल पण तुमचा फिटनेस नसेल तर सामन्यात तुमच्या स्किल्सवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फिटनेस राखणं ही सध्याच्या घडीची सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

Tokyo Olympic : मीराबाईच्या खांद्यांना बळ देणारे मराठी हात, भारताच्या रौप्यपदकामागचं बदलापूर कनेक्शन

    follow whatsapp

    ADVERTISEMENT