Tokyo Olympics 2020: स्वप्नभंग ! ब्रिटनची भारतीय महिलांवर मात, भारताचं पदक हुकलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय पुरुष हॉकी संघाप्रमाणे ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्याचं भारतीय महिला संघाचं स्वप्न अखेरीस संपुष्टात आलेलं आहे. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या संघाने भारतीय महिलांवर ४-३ ने मात करत पदक पटकावलं आहे. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी पिछाडी भरुन काढत सामन्यात आघाडी घेतली होती. परंतू मोक्याच्या क्षणी झालेल्या काही चुकांमुळे भारतीय महिलांना हा सामना गमवावा लागाल.

भारतीय पुरुषांनी कांस्यपदकाच्या लढतीत बाजी मारल्यानंतर भारतीय महिला संघही ग्रेट ब्रिटनविरुद्ध अशीच कामगिरी करुन दाखवले अशी सर्वांना आशा होती. परंतू पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. या सत्रात दोन्ही संघांनी काही सुरेख चाली रचल्या पण दोन्ही बाजूकडच्या बचावफळीने आपला गोलपोस्ट सुरक्षित ठेवला.

परंतू दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच ग्रेट ब्रिटनने गोलपोस्टवरची कोंडी फोडली. एलेना रायरने १६ व्या मिनीटाला मैदानी गोल करत ब्रिटनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ग्रेट ब्रिटनच्या महिला दुसऱ्या सत्रात आक्रमक हॉकी खेळत भारतीय महिलांवर दबाव आणत होत्या. पहिल्या गोलच्या धक्क्यातून सावरण्याचा वेळ मिळतोय न मिळतोय तोच सारा रॉबिन्सनने २४ व्या मिनीटाला पुन्हा एकदा भारतीय संघाचा बचाव भेदत गोलकिपर सविता पुनियालाही चकवलं. ब्रिटनने अवघ्या काही मिनीटांमध्ये २-० अशी आघाडी घेतली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

परंतू भारतीय महिलांनी इथे खचून न जाता आपला खेळ सुरु ठेवला. २५ व्या मिनीटाला भारताला पेनल्टी कॉर्नरवर संधी मिळाली. ज्या संधीचं सोनं करत गुरजीत कौरने भारताचं खातं उघडलं. २६ व्या मिनीटाला आपलं आक्रमण धारदार करत भारताने आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवला. गुरजीत कौरने या संधीचंही सोनं करत भारताला २-० अशी बरोबरी मिळवून दिली. भारतीय महिलांच्या या आक्रमणामुळे ग्रेट ब्रिटनच्या महिला पुरत्या भांबावून गेल्या. २९ व्या मिनीटाला वंदना कटारियाने आणखी एक गोल करत इंग्लंडच्या अडचणी आणखीनच वाढवल्या. काही मिनीटांपूर्वी ०-२ ने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने मध्यांतराला ३-२ अशी आघाडी घेतली.

मध्यांतराला संघ पिछाडीवर पडलेला असतानाही ग्रेट ब्रिटनने तिसऱ्या सत्रात दमदार पुनरागमन केलं. भारतीय महिला संघावर पुन्हा एकदा आक्रमण व्हायला सुरुवात झाली. शॉर्ट पासच्या माध्यमातून भारतीय बचावफळीला भेदण्यात ब्रिटनच्या महिलांना यश आलं. याचा फायदा म्हणून ३५ व्या मिनीटाला इंग्लंडची कॅप्टन हॉली वेब-पेर्नेने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत इंग्लंडला ३-३ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर भारतीय महिलांनाही या सामन्यात गोल करण्याची संधी मिळाली होती. परंतू इंग्लंडने गोलपोस्टचा बचाव करत भारताला आघाडी घेण्याची संधी दिलीच नाही.

ADVERTISEMENT

चौथ्या सत्रात ग्रेट ब्रिटनच्या महिलांनी पूर्णपणे सामन्याची सूत्र आपल्या हाती ठेवली. बॉलचा ताबा जास्तीत जास्त वेळ आपल्याकडे राहील याची काळजी घेत ब्रिटनच्या महिलांनी भारतीय महिलांना फारशी संधीच दिली नाही. परिणामी ४८ व्या मिनीटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर ग्रेस बाल्सडॉनने गोल करत ब्रिटनला सामन्यात पुन्हा एकदा ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. दुसरीकडे भारतीय महिलांचं लक्ष्य विचलीत झालेलं पहायला मिळालं. सामना संपायला ८ मिनीटं बाकी असताना इंग्लंडच्या पेनल्टी एरियात प्रवेश करण्यात भारतीय महिलांना यश आलं. यावेळी भारताने पेनल्टी कॉर्नरही कमावला, परंतू गोल करण्याची संधी भारतीय महिलांनी यावेळेलाही गमावली. सामना संपायला शेवटची ५ मिनीटं बाकी असताना भारतीय महिला बॉलवर ताबा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत होत्या.

ADVERTISEMENT

परंतू ग्रेट ब्रिटनच्या सफाईदार खेळासमोर त्यांचा निभाव लागलेला दिसला नाही. दरम्यान भारतीय महिलांनाही गोल करण्याच्या काही संधी आल्या, पण या संधीचं गोलमध्ये रुपांत झालं नाही. सामना संपायला अवघी दोन मिनीटं शिल्लक असताना भारतीय महिलांनी इंग्लंडवर दबाव टाकत पुन्हा एकदा आक्रमण केलं. परंतू इंग्लंडच्या खेळाडूंनी गोलपोस्टचा अभेद्य बचाव करत भारताचं आक्रमण परतवून लावलं आणि ब्राँझ पदकावर आपलं नाव कोरलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT