Riteish Deshmukh cried : वडिलांची आठवण... ढसाढसा रडला रितेश; आईलाही अश्रू अनावर

Riteish Deshmukh got emotional : वडिलांची आठवण आणि त्यांच्या निधनानंतर काकांनी दिलेल्या भक्कम आधाराबद्दल सांगताना रितेशला हुंदका अनावर झाला आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

भागवत हिरेकर

18 Feb 2024 (अपडेटेड: 18 Feb 2024, 03:54 PM)

follow google news

Riteish Deshmukh cry : "साहेबांना जाऊन बारा वर्षे झाली. थोडीफार... उणीव नेहमीच भासते", असे सांगत असतानाच हुंदका अनावर झाला. अश्रूंचा बांध फुटला... यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. 

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा लातूरमध्ये पार पडला. या कार्यक्रमात रितेश देशमुखने आपल्या भावना व्यक्त केल्या. बोलत असतानाच वडिलांची आठवण आणि त्यांच्या निधनानंतर काकांनी दिलेल्या भक्कम आधाराबद्दल सांगताना रितेशला हुंदका अनावर झाला आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

"साहेबांना जाऊन बारा वर्षे झाली. थोडीफार... उणीव नेहमीच भासते. ही उणीव कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले. यासाठी उभे राहिले की, आपल्याला मुलाला गरज असली, तरी मी आहे आणि नसली तर मी आहे. काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही, पण आज सर्वांच्यासमोर सांगतो की, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण या स्टेजवर आहे", असे सांगत असताना रितेश देशमुखच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. ( व्हिडीओ बघा)

अमित देशमुखांनी दिला धीर

रितेश देशमुखच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला अश्रू थांबवणं अवघड झालं. त्यानंतर स्टेजवरच बसलेले अमित देशमुख त्याच्यापर्यंत गेले आणि त्याला पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर अमित देशमुखांनी त्यांच्या पाठिवर हात ठेवत धीर दिला. 

आईच्या अश्रूंचा फुटला बांध

रितेश देशमुखला बोलत असताना रडू कोसळल्याने व्यासपीठावर बसलेल्या त्यांच्या आईलाही अश्रू रोखता आले नाही. स्टेजवरील मान्यवर आणि उपस्थित सगळ्यांच्याच डोळे डबडबले. 

    follow whatsapp