Vidhansabha Session : भाजपला झटका! अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याने 12 आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन

मुंबई तक

• 09:43 AM • 05 Jul 2021

विधानसभेचं दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवशीच हे अधिवेशन वादळी ठरलं आहे. कारण विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भातला ठराव मांडला जो एकमुखाने मंजूर करण्यात आला. काय झाला ठराव? ५ जुलैला विधानसभेचं कामकाज सुरू असताना […]

Mumbaitak
follow google news

विधानसभेचं दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवशीच हे अधिवेशन वादळी ठरलं आहे. कारण विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भातला ठराव मांडला जो एकमुखाने मंजूर करण्यात आला.

हे वाचलं का?

काय झाला ठराव?

५ जुलैला विधानसभेचं कामकाज सुरू असताना डॉ. संजय कुटे, अॅड. आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अॅड. पराग अळवणी, हरिश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार उर्फ बंटी बागडिया यांनी सभागृहात गैरवर्तन केलं. सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्च भाषण केलं. माईक आणि राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. वारंवार सूचना देऊनही सभागृह तहकूब झाल्यानंतरही माननीय अध्यक्षांच्या दालनात पुन्हा एकदा सगळ्या सदस्यांनी गैरवर्तन केलं. तालिका पीठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. सभागृहाची परंपरा मलीन करणारे अत्यंत अशोभनीय आणि बेशीस्त वर्तन केल्यामुळे ही विधानसभा ठराव करत आहे की या सगळ्या सदस्यांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात यावं. निलंबनाच्या कालावधीत त्यांना मुंबई आणि नागपूरच्या अधिवेशनाच्यावेळी त्या विधानसभेच्या सीमेत येण्यास मनाई करावी. असा ठराव एकमुखाने संमत झाला.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

जो ठराव एकतर्फी मंजूर करण्यात आला आहे आणि आज लोकशाहीचा खून करण्यात आला आहे. हा जाणीवपूर्वक विरोधी पक्षाची संख्या कमी करण्याचा डाव आहे. आम्ही सातत्याने सरकारवर हल्ला करतो त्यामुळे आमची संख्या कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही ही मुस्कटदाबी सहन करणार नाही. आम्ही कामकाजावर या ठिकाणी बहिष्कार टाकतो आहे. हे मोगलाईचं कामकाज आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले तालिका अध्यक्ष भास्कर जाधव?

अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख बसतात. एखाद्या मुद्द्यावर पटत नसलं तर तोडगा काढतात. एकदा सभागृहाच्या बाहेर गेल्यावर मी व्यक्तिगत कुणाशीही कटुता ठेवलेली नाही. प्रत्येकाशी भेटतो आणि बोलतो. मी केवळ अधिवेशन चालविण्याकरीता तालिका अध्यक्ष आहे. मी दालनात बसलेलो असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत रागारागाने तिथे आले. ते खूप चिडलेले होते. मी त्यांना बोललो या बसा. तरीही ते रागातच होते… चंद्रकांतदादा आले. मी त्यांना माझ्या शेजारील खुर्चीत बसवलं. इतर सदस्यांनाही मी बसण्याची विनंती केली. मी त्यांना सांगितलं की आपण यातून मार्ग काढू. मात्र विरोधी पक्षाचे नेते आणि सदस्य शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळी या बाजूच्या अनेक सदस्य आतमध्ये आले. त्यांनी मला माझ्या आई बहिणीवरुन शिव्या दिल्या. मी एकही शब्द खोटं बोलत नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासू शकता. जसे गावगुंड असतात तसे लोकप्रतिनिधी अंगावर आले. मी त्यांना सांगत होतो याना आवरा. पण फडणवीस त्यांना आवरत नव्हते. तुम्ही ५०-६० जण आले तर मी एकटा आहे. मी मागे हटणार नाही. मी मागे हटलो नाही. आज जे घडलं ती स्थिती महाराष्ट्राच्या राजकारण परंपरेला काळीमा फासणारी आहे.

    follow whatsapp