Pubg मध्ये सतत जिंकत असल्याचा राग; मित्रांनीच तरुणाची चाकू-तलवारीने हल्ला करत केली हत्या

मुंबई तक

• 01:45 AM • 02 Mar 2022

पब्जी गेम सतत जिंकत असल्यामुळे मित्रांनी राग मनात धरुन आपल्याच मित्राची धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली आहे. ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात ३ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल जाधव (वय २२) असं या मृत तरुणाचं नाव आहे. सोमवारी रात्री मुख्य आरोपीसह अन्य तिघांनी त्याच्यावर हल्ला […]

Mumbaitak
follow google news

पब्जी गेम सतत जिंकत असल्यामुळे मित्रांनी राग मनात धरुन आपल्याच मित्राची धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली आहे. ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात ३ जणांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल जाधव (वय २२) असं या मृत तरुणाचं नाव आहे. सोमवारी रात्री मुख्य आरोपीसह अन्य तिघांनी त्याच्यावर हल्ला केला होता. मृतक साहिल जाधव पब्जी खेळात हुशार होता. साहिलला नेहमी जास्त किल्स मिळायचे. तसेच तो नेहमी या खेळात जिंकायचा. याचा राग मनात धरुन त्याच्या साथीदारांनी त्याचा काटा काढायचं ठरवलं. साहिलच्या तीन मित्रांनी त्याला घराजवळ असलेल्या गल्लीजवळ गाठले आणि त्याच्या अंगावर चाकू सुरीच्या सहाय्याने सपासप वार करून पळ काढला.

वर्तकनगर पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी प्रणव माळी, राहुल गायकवाड आणि गौरव मिसाळ यांना अटक केली आहे. यातील राहुल आणि गौरव हे अल्पवयीन आहेत. प्रणव माळी याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर दोन आरोपी राहुल आणि गौरव हे अल्पवयीन असल्याने त्यांना भिवंडी येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले असता बाल न्यायालयाने या दोघांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

पब्जी खेळण्याच्या वादातून २०१९ मध्ये साहिल आणि अटक झालेल्या तिन्ही आरोपींमध्ये वाद झाला होता, त्यातून किरकोळ हाणामारी झाली होती. या वादाची अदखलपात्र तक्रारही वर्तकनगर पोलीस ठाण्यात साहिलने दिलेली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    follow whatsapp