लस घेण्यासाठी अभिनेत्री झाली कोविड सेंटरची सुपरवायजर, ठाण्यातील धक्कादायक प्रकार उघड

मुंबई तक

• 04:21 PM • 29 May 2021

एकीकडे राज्यात लसींचा तुटवडा असल्यामुळे सरकारने १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठीचं लसीकरण बंद ठेवलं आहे. ४५ वर्षावरील लोकांना लस मिळावी यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्नशील आहेत. परंतू ठाणे महानगरपालिकेशी संलग्न असलेल्या कोविड सेंटरचं ओळखपत्र तयार करत मीरा चोप्रा या अभिनेत्रीने कोरोनाची लस घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मीरा चोप्रा ही तामिळ, तेलगू सिनेसृष्टीत काम करते. […]

Mumbaitak
follow google news

एकीकडे राज्यात लसींचा तुटवडा असल्यामुळे सरकारने १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठीचं लसीकरण बंद ठेवलं आहे. ४५ वर्षावरील लोकांना लस मिळावी यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्नशील आहेत. परंतू ठाणे महानगरपालिकेशी संलग्न असलेल्या कोविड सेंटरचं ओळखपत्र तयार करत मीरा चोप्रा या अभिनेत्रीने कोरोनाची लस घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

हे वाचलं का?

मीरा चोप्रा ही तामिळ, तेलगू सिनेसृष्टीत काम करते. मीरा चोप्राने ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाजा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवायजर म्हणून काम करत असल्याचं भासवत लस घेतली. महत्वाची गोष्ट म्हणजे मीराने आपण लस घेतानाचा फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत सर्वांना लस घेण्याचं आवाहनही केलं. परंतू ही बाब प्रसारमाध्यमांमध्ये समोर येताच तिने ही पोस्ट डिलीट केली आहे.

दरम्यान या प्रकरणावरुन आता ठाणे शहरातलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीला कोविड सेंटरमध्ये सुपरवायजरचं ओळखपत्र कोणी बनवून दिलं? कोणत्या कारणासाठी दिलं याचा तपास व्हायला हवा अशी मागणी ठाणे मनपाचे भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. ठाणे महापालिकेनेही या प्रकरणाची दखल घेतली असून, उपायुक्त संदीप माळवी यांनी प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे.

ठाण्याच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड रुग्णालयात कर्मचारी पुरवण्याचं काम ओम साई आरोग्य केअर सेंटर या कंपनीकडे आहे. या कंपनीने एका सेलिब्रेटीला सुपरवायजर नेमलं का? की लस घेण्यासाठी या अभिनेत्रीला सुपरवायजरचं ओळखपत्र बनवून देण्यात आलं? पालिका आयुक्तांनी याची चौकशी करुन सर्व प्रकार समोर आणावा अशी मागणी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका या प्रकरणात नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

    follow whatsapp