सगळंच बंद करण्याची वेळ आणू नका; अजित पवारांचा दिला इशारा

मुंबई तक

• 06:29 AM • 03 Sep 2021

राज्यातील काही भागात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यातील मंदिरं खुली करण्याची मागणी भाजपसह मनसेकडून केली जात आहे. या दोन्ही मुद्द्यांवर बोलताना अजित पवार यांनी पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ आणू नका असा इशारा दिला आहे. पुण्यात बोलताना अजित पवारांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि विरोधकांच्या आंदोलनावर भाष्य केलं. माध्यामांशी बोलताना अजित पवार म्हणाले, […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील काही भागात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यातील मंदिरं खुली करण्याची मागणी भाजपसह मनसेकडून केली जात आहे. या दोन्ही मुद्द्यांवर बोलताना अजित पवार यांनी पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ आणू नका असा इशारा दिला आहे. पुण्यात बोलताना अजित पवारांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि विरोधकांच्या आंदोलनावर भाष्य केलं.

हे वाचलं का?

माध्यामांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, ‘केंद्राकडून सांगण्यात आलं होतं की, केरळ पहिल्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर असल्यानं काळजी घ्या. मात्र दुर्दैवानं राज्याच्या ग्रामीण भागामध्ये राहणार्‍या नागरिकांमध्ये करोना आजाराची भीतीच राहिलेली नाही. कुठेही नियम पाळले जात नाही. आता सर्व संपलं आहे, असा काही लोकांमध्ये गोडगैरसमज झाला आहे. त्यामुळे तिथे संख्या वाढायला लागलेली आहे’, असं सांगत अजित पवारांनी चिंता व्यक्त केली.

‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी आव्हान करतात. मात्र त्यातून काहीजण राजकारण करतात. त्यातून काहीजण सण साजरे करण्याचा प्रयत्न करतात. हे जे काही आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे. पुन्हा तिसरी लाट आल्यावर येरे माझ्या मागल्या करून सगळंच बंद करण्याची वेळ राज्यावर आणू नये एवढीच विनंती आहे’, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

मनसेच्या आंदोलनावर अजित पवार म्हणतात…

भाजपपाठोपाठ आता मनसेकडूनही मंदिरं खुली करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘आक्रमक कुणी व्हावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकजण येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लक्षात घेता, स्वतःच अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करणार. स्वतःचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच मंदिरं सुरू करा हा एक भावनिक मुद्दा आहे. यातून काही साध्या करता येऊ शकते का हा अजमावण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. हे निर्विवाद सत्य आहे’, असं भूमिका पवार यांनी मांडली.

12 आमदारांची नियुक्ती…

12 आमदारांची नियुक्ती आणि राजू शेट्टी यांच्याबद्दलच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, ‘राज्यपालांना आम्ही मागील आठवड्यात भेटणार होतो. पण काही कामानिमित्त राज्यपाल दिल्लीला गेले होते. राज्यपालांसोबत आमची भेट झालेली आहे. राज्यातील परिस्थितीबाबत त्यांना आम्ही माहिती दिली. त्यावर ‘योग्य तो निर्णय घेतो’, असं त्यांनी सांगितलं.

‘मी मुंबईत पक्ष कार्यालयात बसलो होतो. तेव्हा हेमंत टकले यांचं नाव शिवसेनेकडून कमी करण्यात आलं आहे, अशा बातम्या पाहण्यास मिळाल्या. अशा सारख्या सारख्या बातम्या आल्या ना, त्यामुळे जनतेचा विश्वास उडेल. या सर्व घटना लक्षात घेता. जोवर संपूर्ण माहिती मिळत नाही, तो पर्यंत बोलणे उचित ठरणार नाही. पण अशा बातम्या कुठून येतात?’, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.

    follow whatsapp