काश्मीर फाईल्स ‘व्हल्गर’ आहे म्हणणाऱ्यांना अनुपम खेर यांनी सुनावलं, म्हणाले… “काही लोक… “

मुंबई तक

• 08:20 AM • 29 Nov 2022

२०२२ या वर्षात बॉक्स ऑफिसवर ज्या सिनेमाची चर्चा सर्वाधिक झाली तो सिनेमा म्हणजे काश्मीर फाईल्स. या सिनेमाची चर्चा पुन्हा होण्याचं कारण आहे ते म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया. या फेस्टिव्हलमध्ये इफ्फीचे ज्युरी हेड नादव लॅपिड यांनी हा सिनेमा व्हल्गर आणि प्रोपगंडा असल्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर आता या सिनेमात काम करणारे मुख्य कलाकार आणि ज्येष्ठ […]

Mumbaitak
follow google news

२०२२ या वर्षात बॉक्स ऑफिसवर ज्या सिनेमाची चर्चा सर्वाधिक झाली तो सिनेमा म्हणजे काश्मीर फाईल्स. या सिनेमाची चर्चा पुन्हा होण्याचं कारण आहे ते म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया. या फेस्टिव्हलमध्ये इफ्फीचे ज्युरी हेड नादव लॅपिड यांनी हा सिनेमा व्हल्गर आणि प्रोपगंडा असल्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर आता या सिनेमात काम करणारे मुख्य कलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे अनुपम खेर यांनी?

मित्रांनो काही लोकांना सत्य जसं आहे तसं पाहण्याची आणि दाखवलं गेल्याची सवय नसते. सत्य आपल्या आवडीच्या सुगंधाप्रमाणे, आपल्या ठरवलेल्या चवीप्रमाणे, रंगाप्रमाणे सजवून आपल्यासमोर असलं पाहिजे असं वाटत असतं. काश्मीरचं वास्तव अनेकांना पचत नाही. त्यामुळे त्यांना वाटतं आहे की हे सत्य एखाद्या रंगीत चश्म्यातून पाहिलं जावं. गेल्या २५ वर्षांपासून हे लोक असंच करत आहेत. काश्मीर फाईल्सने जे वास्तवात घडलं तेच दाखवलं होतं त्यामुळे या लोकांना त्रास होतो आहे. पोटशूळ उठला आहे. जे घडलं ते सत्य भयंकर आहे. ते एक नग्नसत्य आहे ते जर पाहू नसाल तर डोळे बंद करा, तोंड गप्प करा पण या सत्याची खिल्ली उडवणं बंद करा. आम्ही हे सगळं भोगलं आहे. माझ्या काश्मीरमधल्या आया-बहिणींनी हे अत्याचार सहन केले आहेत. त्यामुळे सत्यापासून पाठ फिरवू नका त्यापेक्षा जे पीडित आहेत त्यांच्या वेदना त्यांना विचारा.

आणखी काय म्हटलं आहे अनुपम खेर यांनी?

भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांनी दहशतवादाचा सामना केला आहे. एक सामान्य इस्रायली माणूस काश्मिरी हिंदूंची वेदना समजू शकतो. बाकी आपल्याच देशाचे दुश्मन आपल्याच देशात असतातच हेदेखील एक सत्य आहे ते नाकारता येणार नाही, जय हिंद! असं म्हणत अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर आधारित द कश्मीर फाईल्स चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातच द कश्मीर फाईल्स वर अश्लील आणि प्रचारकी चित्रपटाचा ठपका ठेवण्यात आलाय. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचे ज्युरी हेड आणि इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांसमोर हे मत मांडलं.इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या वतीने 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन गोव्यात करण्यात आले होते. या चित्रपट महोत्सवात नदाव लॅपिड यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपट अश्लील आणि प्रोपगंडा असल्याचं म्हटलं त्यानंतर आता विविध प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे तसंच सोशल मीडियावरही काश्मीर फाईल्सची चर्चा पुन्हा होते आहे.

    follow whatsapp