Pune : लाल महालात लावणीवर नाच, वैष्णवी पाटीलसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई तक

• 05:41 AM • 21 May 2022

छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या लाल महालात लावणीवर नृत्य केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटील यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाल महालाचा रखवालदार राकेश विनोद सोनवणे (वय 37) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. लाल महाल […]

Mumbaitak
follow google news

छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या लाल महालात लावणीवर नृत्य केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटील यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाल महालाचा रखवालदार राकेश विनोद सोनवणे (वय 37) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. लाल महाल या पवित्र वास्तूचे पावित्र्य भंग केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 एप्रिल रोजी, वैष्णवी पाटील हिने आणखी दोन सहकाऱ्यांच्या मदतीने लावणीवर नृत्य करीत असल्याचा व्हीडिओ शूट केला. त्यानंतर हा व्हीडीओ फेसबुकवर आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे वास्तव्य ज्या लाल महालात होतं त्या ऐतिहासिक लालमहालात अशा प्रकारचे कृत्य केल्याने शिवप्रेमी संतापले होते. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्यानंतर फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे लाल महाल लावणी प्रकरण : वैष्णवी पाटीलचा जाहीर माफीनामा!

रखवालदार राकेश सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे, त्यांनी म्हटले आहे की लाल महाल या पवित्र वास्तूचे पवित्र्य भंग करण्यात आलं आहे. लावणीवर नृत्य करीत असताना मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु मला माझे काम करू न देता त्यांनी व्हिडीओ शूट केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

पुण्यातल्या ऐतिहासिक लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याने वाद निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. लाल महालात चंद्रा या गाण्यावर वैष्णवी पाटील या महिला नृत्य कलाकाराने लावणी केली होती. त्यावरूनच हा वाद निर्माण झाला.

पुण्यातला लाल महाल ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. या लाल महालात शाहिस्तेखान थांबला होता तेव्हा त्याची बोटं छत्रपती शिवरायांनी छाटली होती. सध्या पुणे महापालिकेने उन्हाळ्याच्या सुट्टीत हा लाल महाल पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. अशातच लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने तमाशातल्या गाण्यांवर आधारित रिल्सचं शुटिंग करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सिने दिग्दर्शक सुनील बापट आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील यांनी हे कृत्य केलं आहे. व्हीडिओत स्पष्ट दिसतं आहे की नृत्यांगना वैष्णवी पाटील ठुमके लगावत लावणीच्या तालावर लाल महालात नृत्य करते आहे. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. या प्रकरणी वैष्णवी पाटीलने माफीही मागितली आहे.

    follow whatsapp