साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक, संभाजी ब्रिगेडचे दोन कार्यकर्ते अटकेत

मुंबई तक

• 10:09 AM • 05 Dec 2021

ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य संमेलनात शाईफेक करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. वृत्तपत्राचं मनोरंजनीकरण या नावाचा एक परिसंवाद होता ज्यासाठी गिरीश कुबेर या ठिकाणी आले होते. त्यावेळी संभाजी ब्रिगेडच्या दोन कार्यकर्त्यांनी व्हीव्हीआयपी गेटजवळ येऊन त्यांच्या तोंडावर शाई फेकली. साहित्य संमेलनाला या प्रकारामुळे गालबोट […]

Mumbaitak
follow google news

ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य संमेलनात शाईफेक करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. वृत्तपत्राचं मनोरंजनीकरण या नावाचा एक परिसंवाद होता ज्यासाठी गिरीश कुबेर या ठिकाणी आले होते. त्यावेळी संभाजी ब्रिगेडच्या दोन कार्यकर्त्यांनी व्हीव्हीआयपी गेटजवळ येऊन त्यांच्या तोंडावर शाई फेकली. साहित्य संमेलनाला या प्रकारामुळे गालबोट लागलं आहे. आता या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने या दोघांना अटक केली आहे. तसंच हा परिसंवाद सुरू करण्यात आला आहे. मात्र सुरूवातीपासूनच वादाच्या कचाट्यात अडकलेलं हे साहित्यसंमेलन आता नव्या वादात अडकलं आहे हेच दिसून येतं आहे.

हे वाचलं का?

संभाजी ब्रिगेडने या शाई हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गिरीश कुबेर हे सातत्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याने हा हल्ला केल्याचं संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं आहे. साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे. गिरीश कुबेर यांच्यावर केलेल्या या शाईफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग महाराष्ट्र या पुस्तकात छत्रपती संभाजी राजे यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे. त्यामुळे गिरीश कुबेर यांनी माफी आणि राज्य सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती.

नेमका आक्षेप कोणत्या मजकुराबाबत आहे?

१) छत्रपती संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांप्रमाणे सहनशीलता आणि परराष्ट्र धोरण नव्हते. शिवाजीच्या सैन्याने प्रजेवर कधीही अत्याचार केले नाहीत पण संभाजीच्या सैन्याने केले.

२) शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर येण्यासाठी संभाजीने रक्तपात घडवला. संभाजीने सोयराबाई आणि शिवाजी महाराजांच्या हयातीत तयार झालेल्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री ठार केले. या चुकांमुळे स्वराज्यातील कर्तबगार मंडळी नाहीशी झाली आणि याची शिक्षा त्याला पुढे भोगावी लागली.

३) सत्ता काबीज करण्यासाठी संभाजी महाराजांनी महाराणी सोयराबाई यांना ठार केलं’

४) इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर बाजीराव पेशवे आहेत.

असे उल्लेख या पुस्तकात करण्यात आले आहेत. त्यामुळे गिरीश कुबेर यांनी माफी मागावी आणि या पुस्तकातला वादग्रस्त मजकूर मागे घ्यावा अशी मागणी आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड अशा सगळ्यांकडून केली जाते आहे.

    follow whatsapp