नक्षलवाद्यांना पोलिसांचा दणका! स्फोटकांसाठीचं साहित्य घेऊन जाणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

मुंबई तक

• 10:09 AM • 20 Feb 2022

–व्यंकटेश दुदमवार, गडचिरोली घातपाती घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांना स्फोटकं आणि इतर साहित्याच्या पुरवठा करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळत पोलिसांनी दणका दिला. स्फोटक साहित्य पुरवठा करणाऱ्या नक्षल समर्थक टोळीचा गडचिरोली पोलिसांनी पर्दाफाश करत चार जणांना अटक केली. या कारवाई वेळी एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. काही जण महाराष्ट्रामार्गे तेलंगणामधून छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांना साहित्य पोहोचवण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना […]

Mumbaitak
follow google news

व्यंकटेश दुदमवार, गडचिरोली

हे वाचलं का?

घातपाती घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांना स्फोटकं आणि इतर साहित्याच्या पुरवठा करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळत पोलिसांनी दणका दिला. स्फोटक साहित्य पुरवठा करणाऱ्या नक्षल समर्थक टोळीचा गडचिरोली पोलिसांनी पर्दाफाश करत चार जणांना अटक केली. या कारवाई वेळी एक जण फरार होण्यात यशस्वी झाला.

काही जण महाराष्ट्रामार्गे तेलंगणामधून छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांना साहित्य पोहोचवण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे जिमलगट्टा उपविभागांतर्गत दामरेचा उप पोलीस स्टेशन हद्दीतील भंगारामपेठा गावात उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात दामरंचा पोलीस स्टेशनचे जवान व शीघ्र कृती दलाचे जवानांनी नक्षलविरोधी अभियान हाती घेतलं.

पोलिसांनी सापळा रचला आणि तेलंगणामधून दामरंचा मार्गे छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांना काही साहित्य घेऊन जात असलेल्यांच्या मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या. १० कार्डेक्स वायरचे बंडल (एकुण ३५०० मीटर लांब) व इतर नक्षल साहित्य पोलिसांनी या टोळीकडून जप्त केले.

नक्षलवाद्यांना साहित्याचा पुरवठा करणाऱ्यांमधील राजु गोपाल सल्ला (वय ३१, रा. आसिफनगर, एनटीआर कॉलनी, जि. करीमनगर, तेलंगणा), काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे (वय २४, रा. भंगारामपेठा ता. अहेरी), साधु लच्चा तलांडी (वय ३९), मोहम्मद कासिम शादुल्ला (रा. एनटीआर तामिळ कॉलनी, बाबुपेठ, आसिफनगर, जि. करीमनगर, तेलंगणा) यांना अटक करण्यात आली आहे. तर छोटु ऊर्फ सिनु मुल्ला गावडे (रा. भंगाराम पेठा ता. अहेरी) कारवाई दरम्यान फरार झाला. फरार आरोपीचा गडचिरोली पोलीस दलाकडुन शोध घेतला जात आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, समीर शेख, जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली दामरंचे पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या पथकाने केली.

    follow whatsapp