Maharashtra Flood : महाराष्ट्रात पावसाचा कहर, सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला

मुंबई तक

• 05:47 PM • 23 Jul 2021

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, ढगफुटीचं थैमान आहे. चिपळूण, महाड, रायगड यानंतर आता कोल्हापूर आणि सांगलीमद्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा या ठिकाणी दरड कोसळल्याने अनेक लोकांचा मृत्यूही झाला आहे. केंद्र सरकारने या आस्मानी संकटात मदत करावी यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, ढगफुटीचं थैमान आहे. चिपळूण, महाड, रायगड यानंतर आता कोल्हापूर आणि सांगलीमद्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा या ठिकाणी दरड कोसळल्याने अनेक लोकांचा मृत्यूही झाला आहे. केंद्र सरकारने या आस्मानी संकटात मदत करावी यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रात पावसाचा कहर कसा माजला आहे, पूरस्थिती कशी निर्माण झाली आहे याची माहिती अमित शाह यांना या तिघांनी दिली. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भातली माहिती ट्विट करून दिली आहे.

हे वाचलं का?

सुप्रिया सुळे, अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी अमित शाह यांना महापूर, दरड कोसळून घडलेल्या घटना, तळये गावाचं भूस्खलन या सगळ्याची माहिती दिली. आज दुपारीच अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पूरस्थिती आणि पावसाचा आढावा घेतला होता. त्यानंतर या तीन खासदारांनीही अमित शाह यांना महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती दिली. अमित शाह यांनी सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन दिलं आहे. ज्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांचे आभारही मानले आहेत.

आजच महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशीही फोनवरून चर्चा केली. राज्यात सध्या काय स्थिती आहे पूर आणि पावसाचा कहर हा कसा आहे याची सविस्तर माहितीही दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुरूवारी उद्धव ठाकरे यांना फोन करून महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेतला होता. एवढंच नाही तर आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाड येथील दरड दुर्घटनेत ज्यांचा बळी गेला त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना 50 हजारांचीही मदत दिली आहे. उद्धव ठाकरे सरकारनेही दरड दुर्घटनांमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील सातत्याने महाराष्ट्रातील पूरस्थिती, पाऊस आणि बचावकार्य कसं सुरू आहे याचा आढावा घेत आहेत.

राज्यात ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतो आहे त्या ठिकाणी जी आपात्कालीन स्थिती निर्माण होते आहे तिथेही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष ठेवून आहेत. जीवितहानी होऊ नये, जास्तीत जास्त लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. NDRF, SDRF यांची पथकं, स्थानिक बचाव पथकं ही देखील मदत आणि बचाव कार्यात उतरली आहेत. सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते त्यानुसार आवश्यक ती सगळी उपाय योजना करणं सुरू आहे.

महाराष्ट्रात जी काही परिस्थिती आत्ता निर्माण झाली आहे त्याची सविस्तर माहिती आज सुप्रिया सुळे, प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे. अमित शाह यांनीही सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं आहे.

    follow whatsapp