‘युतीबाबत आमच्याशी चर्चा नाही;’ संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीवर काय म्हणाले जयंत पाटील?

मुंबई तक

28 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:48 AM)

शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची घटना घडली. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा करण्यात आली होती. यावर सर्व स्तरावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युतीबाबत आमच्यासोबत चर्चा […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची घटना घडली. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा करण्यात आली होती. यावर सर्व स्तरावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युतीबाबत आमच्यासोबत चर्चा झालेली नाही, मात्र संभाजी ब्रिगेडला जर आघाडीत यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

हे वाचलं का?

काय म्हणाले जयंत पाटील?

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाली याबाबतीत आमच्या सोबत चर्चा नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. चर्चा जरी झाली नसली तरी ज्या अर्थी संभाजी ब्रिगेड शिवसेनेसोबत आहे, त्याअर्थी त्यांना जर महाविकास आघाडीत यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे, असं देखील जयंत पाटील म्हणालेत. शनिवारी बुलढाण्यातील मलकापूर येथे पक्षाच्या आढावा बैठकीसाठी पाटील आले होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारवर निशाणा साधला

आम्ही सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती मात्र, त्यांनी अतिशय सुमार आणि जुजबी उत्तर दिलंय. असा आरोप यावेळी जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केलाय. नुसत्या घोषणा झाल्यात मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. शिंदे सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी ही आमची सभागृहातही मागणी होती आणि आजही आहे. राज्य सरकार हे मंत्रिमंडळ स्थापनेत आणि अंतर्गत मतभेद सोडवण्यात बिझी आहे. त्यांनी शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडले आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेंव्हा पत्रकारांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर प्रश्न विचारला असता, त्यांनी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली. या प्रश्नावर त्यांनी फक्त ‘विनाश काले विपरीत बुद्धी’, अशी प्रतिक्रिया देत खोचक टोला लगावला. आता संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीचा काय फायदा होणार, हे येणारा काळच ठरवेल. मात्र या युतीमुळं शिंदे गट आणि भाजपला काय नुकसान होणार, हेही पाहणं गरजेचं असणार आहे.

    follow whatsapp