Omicron: मोठी बातमी.. महाराष्ट्रातही झाली ओमिक्रॉनची एंट्री, ‘या’ शहरात सापडला पहिला रुग्ण

मुंबई तक

• 02:13 PM • 04 Dec 2021

दक्षिण अफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेल्या एका तरुणाला ओमिक्रॉन (Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता देशात कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉनची एंट्री झाली आहे. ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. अशातच ओमिक्रॉनचा रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याने महाराष्ट्र सरकारची चिंता आता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 […]

Mumbaitak
follow google news

दक्षिण अफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेल्या एका तरुणाला ओमिक्रॉन (Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता देशात कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉनची एंट्री झाली आहे. ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. अशातच ओमिक्रॉनचा रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याने महाराष्ट्र सरकारची चिंता आता वाढली आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर 2021 रोजी द. अफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरिएंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. हा नव्या व्हेरिएंटचा राज्यातील पहिलाच रुग्ण असल्याचे समजते आहे.

हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर 2024 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरुपाचा असून तो सध्या कल्याण-डोंबिवली येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.

या रुग्णाच्या 12 अती जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि 23 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोव्हिड निगेटिव्ह आढळून आले आहेत. याशिवाय या तरुणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोव्हिड निगेटिव्ह आढळलेले आहेत. याशिवाय आणखी निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

या दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या 60 वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमिक्रॉन आढळलेला नाही. तथापि डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.

आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व 3839 प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या 17,107 प्रवाशांपैकी 344 प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे.

Covid 19 : आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; KDMC प्रशासनाची उडाली झोप

मुंबई विमानतळावरील तपासणीत 1 डिसेंबरपासून आतापर्यंत 8 प्रवासी कोव्हिड बाधित आढळले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठिण्यात आले आहेत.या शिवाय राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोव्हिड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे. असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहेत.

    follow whatsapp