पैसे द्या नुकसानीची टक्केवारी वाढवतो, विमा कंपनी प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची लूट

मुंबई तक

• 08:01 AM • 19 Oct 2021

गणेश जाधव, प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद , कळंब तालुक्यातील शेतकरी पार कोलमडून पडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे. सर्वत्र अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासाच्या आत ऑनलाईन व ऑफलाईन देण्याचे बंधनकारक आहे. मात्र खराब […]

Mumbaitak
follow google news

गणेश जाधव, प्रतिनिधी

हे वाचलं का?

अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद , कळंब तालुक्यातील शेतकरी पार कोलमडून पडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे. सर्वत्र अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासाच्या आत ऑनलाईन व ऑफलाईन देण्याचे बंधनकारक आहे. मात्र खराब वातावरणामुळे नेटवर्क नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन तक्रारी दिल्या.

या तक्रारीच्या अनुषंगाने उस्मानाबाद तालुक्यातील कारी शिवारात बजाज अलायन्झ पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने जाऊन पंचनामे केले.  पंचनामा करताना त्या प्रतिनिधीने अनेक शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केली. ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले अशा शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची टक्केवारी जास्ती प्रमाणात दाखविण्यात आली. तर ज्यांनी पैसे देण्यास असमर्थता दाखविली त्यांचे नुकसान झालेले असतानादेखील अगदी अल्प दाखविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हे दाखल करण्यासह पुन्हा पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी प्रत्येकी 100 ते 300 रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे , विशेष म्हणजे विमा कंपनीच्या पंचनामा करणाऱ्या व्यक्तीने ही रक्कम शेतकऱ्यांकडुन ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतली आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना विमा प्रतिनिधी पैसे मागून लुटत आहेत.

नितीन पाठक व रणजित विधाते यांच्याकडून ऑनलाईन रक्कम घेतली असुन अशी अनेक उदाहरणे या गावात आहेत.विधाते यांनी मुहिब अजिजुर रहेमान यां नावाच्या मोबाईल नंबर ८८८८५३९४३७ या खात्यावर फोन पेद्वारे ३०० रुपये जमा केले तर पाठक यांनी २०० रुपये जमा केले , शेतकरी आता या लुटीची कागदपत्रे पुराव्यासह दाखवीत आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या विमा कंपनी व प्रतिनिधीवर गुन्हे नोंद करावे अशी मागणी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी तुळजापूर येथे दिंडी यात्रेच्या समारोप प्रसंगी केली आहे.

पैशासाठी वाटेल ते!

पैशासांठी वाट्टेल ते करणारी मंडळी आपल्याला सर्व क्षेत्रात दिसतात. त्यापासून विमा कंपनीचे प्रतिनिधी अपवाद कसे असतील ? याचा प्रत्यय उस्मानाबाद तालुक्यातील कारि या गावातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आला आहे. कारी येथील शेतकरी दिलीप सदाशिव हाजगुडे यांच्या गट नं. ९६५ मध्ये असलेल्या सोयाबीनचे तलावाचे पाणी घुसून अतोनात नुकसान झालेले आहे. याचा पंचनामा करताना त्यांनी पैसे दिले नसल्यामुळे पीक नुकसानीची टक्केवारी कमी दाखविली.

मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी माझे नुकसान इतके कमी का दाखवले ? असे विचारले असता तुम्ही पैसे द्या टक्केवारी वाढवतो असे सांगितले. त्यांनी पैसे दिल्यानंतर त्याच क्षेत्राचे जास्त नुकसान दाखविले आहे. त्या शेतकऱ्याने ०४०१२७२१००४०१२३०२०५०३ या आयडी क्रमांकावर विमा रक्कम भरलेली आहे. तर यासाठी या प्रतिनिधीने या शेतकर्‍याच्या नावे पैसे देण्यापूर्वी ००६८७००० व पैसे घेतल्यानंतर ००७२२९२० असे दोन वेगवेगळे पीक नुकसानीचे पंचनामे केले आहेत हे विशेष. असाच प्रकार नितीन पाठक, रणजीत विधाते यांच्यासह इतर अनेक शेतकऱ्यांबरोबर झाला आहे.

    follow whatsapp