एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धग ‘सिल्व्हर ओक’पर्यंत; शरद पवारांनी मांडली भूमिका

मुस्तफा शेख

• 01:57 PM • 08 Apr 2022

गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर असून, आज (८ एप्रिल) दुपारी अचानक आक्रमक झालेले संपकरी कर्मचारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर धडकले. सिल्व्हर ओक बाहेर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकारावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या असून, शरद पवार यांनीही त्यांची […]

Mumbaitak
follow google news

गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर असून, आज (८ एप्रिल) दुपारी अचानक आक्रमक झालेले संपकरी कर्मचारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर धडकले. सिल्व्हर ओक बाहेर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकारावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या असून, शरद पवार यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

हे वाचलं का?

‘हा फडणवीसांचा कट, सदावर्तेंनाही आम्ही सोडणार नाही’, ST कर्मचारी आणि NCP कार्यकर्ते आमनेसामने

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओक येथे केलेल्या आंदोलनावर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचं मत मांडलं. पवार म्हणाले, “आज जे काही घडलं त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याचं कारण नाही. नेता शहाणा नसला की, कार्यकर्त्यावर सुद्धा दुष्परिणाम होतो. त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं आहे.”

“राजकारणामध्ये मतभेद असतात. संघर्ष असतात, पण आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रात टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता, तो शोभनीय नव्हता. एसटी कर्मचारी आणि आपला पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचे घनिष्ठ संबंध आहेत. गेल्या ४०-५० वर्षात त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडून चुकलं नाही,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

‘आमच्यावर चपला फेकून करुन प्रश्न सुटणार नाही’, आंदोलकांची घरावर चाल, सुप्रिया सुळेंनी जोडले हात!

“ज्या-ज्या वेळी प्रश्न निर्माण झाले. ते प्रश्न सोडवण्यासाठी सर्व सहकाऱ्यांनी कष्ट घेतले. यासंबंधात एक चुकीचा रस्ता कुणीतरी दाखवला आणि त्याचे दुष्परिणाम आज या ठिकाणी आहेत. कारण नसताना काही महिने घरंदारं सोडून एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिले आहेत. त्यामुळे प्रचंड मोठं आर्थिक संकट कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर आलेलं आहे. दुर्दैवाने काही व्यक्तींना आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे जे नेतृत्व अशी टोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते, तेच नेतृत्व आत्महत्या आणि तत्सम गोष्टींना जबाबदार आहे. यातून जे काही नैराश्य आलंय, ते कुठेतरी काढलं पाहिजे, त्यामुळे त्यांनी याठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला,” असं मत पवारांनी मांडलं.

“आपण सर्वजण एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही. त्यांना कुणी चुकीचा रस्ता दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणं ही तुमची-माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, इतकंच मी सांगतो. अनेक इथे होते, त्यामुळे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. संकट आलं की आपण सगळे एक आहोत हेच तुम्ही दाखवलं. त्याबद्दल तुमचे आभार,”अशी भूमिका शरद पवारांनी आजच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल मांडली.

    follow whatsapp