Sanjay Raut: उद्यापासून सरकारच्या भवितव्याचा फैसला; कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तरी…

मुंबई तक

• 09:33 AM • 19 Jul 2022

नवी दिल्ली: शिवसेना पक्षाविरोधात बंड करत जवळपास 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर आता खासदार ही शिंदे गटात सामिल होण्याच्या मार्गावर आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. आतापर्यंत कधीच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना सरकार स्थापनेसाठी दिल्लीला यावे […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: शिवसेना पक्षाविरोधात बंड करत जवळपास 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर आता खासदार ही शिंदे गटात सामिल होण्याच्या मार्गावर आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. आतापर्यंत कधीच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना सरकार स्थापनेसाठी दिल्लीला यावे लागले नव्हते. एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे हायकमांड दिल्लीमध्ये आहे म्हणून ते दिल्लीमध्ये येतात अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

हे वाचलं का?

संजय राऊत हे एकनाथ शिंदे तसंच भाजपबाबत काय म्हणाले ?

एकनाथ शिंदे आता लोकसभेत देखील शिवसेनेला सुरुंग लावण्यासाठी सज्ज आहेत, ते लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले पक्षाचे चिन्ह आणि संघटनेच्या नियंत्रणासाठी लढाई शेवटपर्यंत सुरु राहिल. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा भाजपचा डाव आहे आणि म्हणून शिवसेना फोडत असल्याची गंभीर टीका भाजपवरती संजय राऊत यांनी केली आहे.

पुढे राऊत म्हणाले ”राज्यात काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आहे, राज्य अडचणीमध्ये आहे तरीही एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजपचा शिवसेनेचा संसदीय पक्ष फोडण्याचाही डाव आहे.” आम्ही कोणत्याही लढ्यासाठी तयार आहोत, मग ते चिन्ह असो वा पक्षसंघटना, बंडखोरांना भविष्यात कोणतीही निवडणूक जिंकणे कठीण असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फुटलेल्या लोकांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या गेल्या अनेक वर्षांत भरपूर मदत केल्याची आठवण संजय राऊतांनी करुन दिली. “मला कधीच शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी किंवा नारायण राणे यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर मुद्द्यांसाठी राजधानीत फेऱ्या मारल्याचे आठवत नाही”. असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षात फुट पडल्यानंतर आता संसदीय पक्षात देखील फुट पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा एक वेगळा गट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून राहुल शेवाळे यांना गटनेता करा आणि आमच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्या अशी मागणी करणार असल्याची मागणी सुत्रांनी दिली आहे.

    follow whatsapp