Taliban First PC : काय असेल तालिबानचं रूप? महिला, विदेशी याबाबत काय भाष्य करण्यात आलं?

मुंबई तक

• 05:27 AM • 18 Aug 2021

Afghanistan ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने पहिली पत्रकार परिषद घेतली. यामध्ये तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी हे आश्वासन दिलं आहे की ते कोणत्याही ‘आंतरराष्ट्रीय दुतावासाला किंवा संस्थेला हानी पोहचवणार नाहीत. तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता दिली पाहिजे आमच्याशी यापूर्वी जे कुणी लढलं आहे त्यांना आम्ही माफ केलं आहे’ असंही मुजाहिद यांनी म्हटलं आहे. आणखी काय म्हणाले मुजाहिदी? […]

Mumbaitak
follow google news

Afghanistan ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने पहिली पत्रकार परिषद घेतली. यामध्ये तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी हे आश्वासन दिलं आहे की ते कोणत्याही ‘आंतरराष्ट्रीय दुतावासाला किंवा संस्थेला हानी पोहचवणार नाहीत. तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता दिली पाहिजे आमच्याशी यापूर्वी जे कुणी लढलं आहे त्यांना आम्ही माफ केलं आहे’ असंही मुजाहिद यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले मुजाहिदी?

‘तालिबान कुणावरही सूड उगवणार नाही. आम्ही आमच्या शेजारी देशांना आश्वासन देऊ इच्छितो की आमची माती चुकीच्या कामासाठी वापरली जाणार नाही. आम्हाला आशा आहे की आंतरराष्ट्रीय समुदाय आम्हाला ओळखेल. आम्ही लवकरच सराकर स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहोत. सगळ्या लोकांशी संपर्क साधण्याचा आम्ही आमच्या परिने पूर्ण प्रयत्न करू. सगळ्या अफगाणी नागरिकांनी आम्हाला साथ द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. ज्याला देशाची सेवा करायची आहे त्याच्याकडे मुळीच दुर्लक्ष केलं जाणार नाही. लवकरच सरकारची घोषणा केली जाईल आणि सगळ्या समस्या मिटतील’

विदेशी सुरक्षा दल, त्यांच्यासोबत काम करणारे कंत्राटदार, अनुवादक यांचं काय असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की ‘आम्हाला कुणाचाही सूड घ्यायचा नाही. जे युवक अफगाणिस्तानात लहानाचे मोठे झाले आहेत त्यांनी हा देश सोडून जावं असं आम्हाला मुळीच वाटत नाही. ते आमची संपत्ती आहेत. कोणीही त्यांच्या दरवाजा ठोठावून तुम्ही कुणासाठी काम करता हे विचारणार नाही. आमच्या सरकारमध्ये हे सगळे लोक सुरक्षित असतील. कोणाचीही चौकशी केली जाणार नाही तसंच कुणाचाही पाठलागही केला जाणार नाही.’

महिलांच्या अधिकारांबाबत काय असा प्रश्न विचारला असता मुजाहिद म्हणाले की ‘महिलांना आम्ही आमच्या व्यवस्थेत समाविष्ट करणार आहोत एवढंच नाही तर त्यांना शिक्षणाचाही अधिकार देणार आहोत. महिला आपल्या समाजाचा पाया आहेत ही बाब आम्हाला ठाऊक आहे त्यामुळेच त्यांना समाजाच्या प्रगतीसाठी यंत्रणेत समाविष्ट करून घेतलं जाईल. शरिया कायद्यानुसार आम्ही महिलांच्या हक्कांचं रक्षण करू. महिला आमच्या सरकारमध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला हा विश्वास देऊ इच्छितो की महिलांसोबत कोणताही भेदभाव आम्ही करणार नाही.आम्ही शरिया कायद्याला अनुसरून महिलांना त्यांचे अधिकार बहाल करू तसंच त्यांना स्वातंत्र्यही असणार आहे. आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यासाठी महिला काम करतील.’

US Taliban Afghanistan : तालिबान म्हणजे काय? अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य परतल्याने भारत का चिंतेत? समजून घ्या

याच पत्रकार परिषदेत मुजाहिद यांना मीडियाविषयीही प्रश्न विचारण्यात आला. कारण 20 वर्षांपूर्वी तालिबानने मीडियावर पूर्णतः बंदी घातली होती. अशावेळी आता तालिबानची भूमिका काय असेल ते विचारलं असता मुजाहिद म्हणाले की, ‘मीडियाने आमच्यातल्या कमतरता आम्हाला लक्षात आणून द्याव्यात, त्यामुळे आम्ही आमच्या राष्ट्राची सेवा योग्य प्रकारे करू शकू. मात्र मीडियाने इस्लामी मूल्यांच्या विरोधात कोणतंही काम करू नये’ असंही बजावण्यात आली आहे. आमच्या सरकारमधमध्ये खासगी मीडिया आधीप्रमाणेच काम करू शकतो असंही मुजाहिद यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला आता अफगाणिस्तानमध्ये स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करायची आहे. आम्ही पूर्ण देश आता जिंकला आहे. मात्र आमच्यासोबत जे लढले त्यांनाही आम्ही माफ केलं आहे असंही मुजाहिद यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp