Rain Alert : मुंबई-पुण्यासह राज्यात आज-उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई तक

• 02:59 AM • 06 Sep 2021

राज्यात आजपासून पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने सांगली सोलापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण राज्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. (rain alert for mumbai and maharashtra) राज्यातील […]

Mumbaitak
follow google news

राज्यात आजपासून पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने सांगली सोलापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण राज्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. (rain alert for mumbai and maharashtra)

हे वाचलं का?

राज्यातील काही वगळता उर्वरित ठिकाणी गेल्या आठवड्यापासून पाऊस होत आहे. त्यातच आता पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. पावसाचा जोर वाढणार असून, कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीसाठी घरांकडे निघालेल्या कोकणवासीयांच्या वाटेत पावसामुळे विघ्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून कोकणसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे पुढील तीन दिवसांसाठी कोकणला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 6 ते 9 सप्टेंबरपर्यंत अतिमुसळधार पाऊस होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी (IMD Mumbai) पावसाबद्दलची माहिती दिली आहे.

आज (6 सप्टेंबर) कुठे असेल पाऊस?

सोलापूर आणि सांगली हे दोन जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर या चार जिल्ह्यांसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगबाद, नाशिक, कोल्हापूरसह राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

उद्या (7 सप्टेंबर) काही भागात आणखी जोर वाढणार

राज्यातील 13 जिल्ह्यांना 7 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला असून, यात मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना व अकोला या जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे. तर अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, जळगाव, अमरावती, या जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

8 सप्टेंबर : मुंबईसह 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

8 सप्टेंबर रोजी राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून, ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, अमरावती, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    follow whatsapp