संजय राऊत यांच्यामागे ED हात धुऊन का लागली आहे? पत्रा चाळ प्रकरण काय आहे?

दिव्येश सिंह

• 08:41 AM • 09 Feb 2022

मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी हा आरोप केला आहे की 1034 कोटींच्या पत्रा चाळ प्रकरणाची चौकशी ईडीकडून केली जाते आहे ते अकारण आहे. त्यामध्ये भाजपकडून ईडीचा वापर केला जातो आहे. या प्रकरणात मला, माझ्या नातेवाईकांना, निकटवर्तीयांना, मित्रांना अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो आहे. आपल्या […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी हा आरोप केला आहे की 1034 कोटींच्या पत्रा चाळ प्रकरणाची चौकशी ईडीकडून केली जाते आहे ते अकारण आहे. त्यामध्ये भाजपकडून ईडीचा वापर केला जातो आहे. या प्रकरणात मला, माझ्या नातेवाईकांना, निकटवर्तीयांना, मित्रांना अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो आहे.

हे वाचलं का?

आपल्या चार पानी पत्रात संजय राऊत यांनी हादेखील उल्लेख केला आहे की महिन्याभरापूर्वी मला अशीही धमकी देण्यात आली होती की महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी तयार व्हा. त्यांचं हेदेखील म्हणणं होतं की असं झालं तर राज्यात मध्यावधी निवडणूक लागेल. मी या गोष्टीला नकार दिला तर मला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल. तसंच नकार देणं महागात पडू शकतं. अशातही संजय राऊत म्हणाले की मी त्यांना सपशेल नकार दिला त्यामुळेच माझ्यामागे आता ईडीचा ससेमिरा लावला जातो आहे. काही लोक बेकायदेशीरपणे ईडीच्या कार्यालयात जातात कुणाला त्रास द्यायचा त्याची यादी देतात. मी जे म्हणतो आहे देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे असंही त्यांनी सुनावलं आहे. तसंच चार पानी पत्र त्यांनी शरद पवार यांनाही पाठवलं आहे. महाराष्ट्रातल्या दोन बड्या मंत्र्यांनाही आम्ही गजाआड करणार आहोत असंही सांगण्यात आल्याचं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

अशा सगळ्यात ज्या पत्राचाळ प्रकरणावरून संजय राऊत यांनी दिल्लीत काही पत्रकारांशी संवाद साधून मी लवकरच याबाबत सेनाभवन या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांच्यामागे ईडीची चौकशी लागली आहे ते प्रकरण नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊ.

ठाकरे सरकार पाडण्यासाठी धमकी देण्यात आली होती, संजय राऊतांच्या ‘लेटरबॉम्ब’ने खळबळ

काय आहे पत्रा चाळ प्रकरण?

गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडासोबत गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी करार केला होता. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनला याठिकाणी 3,000 अधिक फ्लॅट तयार करायचे होते. एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट हे पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरुआशिष फ्लॅटकडे राहणार होते.

दरम्यान, गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केली. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.

ईडीने अटक केलेले प्रवीण राऊत हे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांच्यासह फर्मचा एक संचालक होते. मार्च 2018 मध्ये म्हाडाने गुरुआशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊत यांना EOW ने अटक केली होती तर सारंग वाधवन अटकेत होता. मार्च 2018 मध्ये म्हाडाने गुरुआशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊतला EOW ने अटक केली होती तर सारंग वाधवानला EOW ने त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये EOW ने अटक केली होती. त्यानंतर राऊत यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

‘ईडीसारख्या तपासयंत्रणांचा भाजपकडून गैरवापर’ संजय राऊत यांची उपराष्ट्रपतींकडे तक्रार

ईडीने या प्रकरणी ईसीआयआर नोंदवला आणि 1 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत आणि त्यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्या निवासस्थानांसह सुमारे सात ठिकाणी झडती घेतली. राऊत यांना 2 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती, तर पाटकरांचा जबाब ईडीने नोंदवला होता. राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र असून पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना त्यांचे नावही समोर आले होते. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे समोर आले होते, ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला होता. त्यानंतर ईडीने वर्षा आणि माधुरी राऊत यांचे जबाब नोंदवले.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2010 मध्ये प्रवीण राऊत यांना त्याच्या बँक खात्यात इक्विटी आणि जमीन व्यवहाराच्या नावाखाली 95 कोटी रुपये मिळाले होते तरीही कंपनी प्रकल्प पूर्ण करू शकली नाही आणि कोणतेही उत्पन्न मिळाले नाही.

या प्रकरणात ईडीने ज्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली ते सुजित पाटकर हे प्रवीण राऊत यांचा सहकारी आणि संजय राऊत यांच्याशी त्याचे जवळचे संबंध आहेत. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींसह वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये गेल्या वर्षभरापासून भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने यापूर्वी अलिबाग येथे संयुक्तपणे जमीन खरेदी केली होती.

याच कारणामुळे अलिबाग येथील जमिनीचा व्यवहारही ईडीच्या रडारवर आहे. या व्यवहारासाठी घोटाळा केलेले पैसे वापरण्यात आले असं संशय ईडीला आहे. एवढंच नाही तर पाटकर यांना मुंबई आणि पुण्यात जंबो कोव्हिड सेंटर उभारण्याचीही कंत्राटं मिळाली त्यामाध्यमातूनही भ्रष्टाचार झाला असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. या प्रकरणा त्यांनी सुजित पाटकर आणि त्यांच्या फर्मविरोधात पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.

संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना लिहिलेल्या पत्रात हा आरोप केला आहे की, त्यांचा, त्यांच्या नातेवाईकांचा आणि मित्रांचा ईडीकडून छळ केला जात आहे. या पत्रात असे लिहिले आहे की “विधानसभा, खासदार, विरोधी पक्ष आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धमकावण्यासाठी आणि छळण्यासाठी सत्तेत असलेल्या राजकीय पक्ष तपास एजन्सींचा वापर करू शकत नाही. तपास यंत्रणांनी निष्पक्ष आणि निष्पक्षपणे वागले पाहिजे, तथापि ईडी आणि इतर केंद्रीय एजन्सींचा वापर हेतुपुरस्सर केला जात आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारं पाडण्याचा हेतू यामागे दिसतो आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला धमकी देण्यात आली. सुमारे महिन्याभरापूर्वी हा प्रकार घडला होता. महाराष्ट्रातलं सरकार पडलं की मध्यावधी निवडणुका लागतील. तसंच मी जर ऐकलं नाही तर तुमची अवस्था लालूप्रसाद यादव यांच्यासारखी केली जाईल अशी धमकीही देण्यात आली. मी जर या सगळ्याला नकार दिला तर मला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असंही धमकावण्यात आलं. एवढंच नाही तर महाराष्ट्रातले दोन बडे मंत्रीही खडी फोडायला जाणार आहेत असंही धमकावण्यात आलं. मी या सगळ्याला भीक घातलेली नाही असं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

ईडी या प्रकरणातील गुन्ह्यातील रक्कम शोधण्यासाठी सर्व संभाव्य दुव्यांचा तपास करत आहे. तपासादरम्यान, सुमारे 1034 कोटी रुपयांचा अपहार झाला आहे का या शोध घ्यावा लागेल. 1034 कोटी रुपयांचा घोटाळा कुणी कुणी केला त्या प्रत्येकाचा शोध घेतला जातो आहे. जे दोषी आढळतील अशा सर्वांची नावे आरोपी असतील. या पैशांमधून मालमत्ता खरेदी केली गेली असेल किंवा गुंतवणूक केली गेली असेल किंवा पैसे वैयक्तिक कारणासाठी वापरले गेले असतील तर त्याचाही तपास केला जाईल. या सगळ्या अंगाने ईडीकडून केला जातो आहे.

    follow whatsapp