अरेरे! दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन महिलेनं संपवलं आयुष्य

मुंबई तक

• 01:45 AM • 19 Oct 2021

गिरणी पीठ दळून आणते म्हणून घरातून बाहेर पडलेल्या महिलेनं आपल्या दोन चिमकुल्यांसह आयुष्य संपवल्याची ह्रदयद्रावक घटना अकोला जिल्ह्यातील चांगेफळ येथे घडली आहे. पूजा गजानन काळे (वय 28) असं मयत महिलेचं नाव असून, तनु गजानन काळे (वय ८ वर्ष), स्वामी गजानन काळे (वय 8 महिने) अशी दोन्ही मुलांची नावे आहेत. अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस […]

Mumbaitak
follow google news

गिरणी पीठ दळून आणते म्हणून घरातून बाहेर पडलेल्या महिलेनं आपल्या दोन चिमकुल्यांसह आयुष्य संपवल्याची ह्रदयद्रावक घटना अकोला जिल्ह्यातील चांगेफळ येथे घडली आहे. पूजा गजानन काळे (वय 28) असं मयत महिलेचं नाव असून, तनु गजानन काळे (वय ८ वर्ष), स्वामी गजानन काळे (वय 8 महिने) अशी दोन्ही मुलांची नावे आहेत.

हे वाचलं का?

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चांगेफळ गावात ही घटना घडली. गावातील विवाहित महिला पूजा काळे यांनी दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (18 ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेनंतर चांगेफळ गावासह परिसरात खळबळ उडाली.

मयत महिला सोमवारी दुपारी पीठगिरणीतून दळण आणते असं सांगून मुलगी तनु व मुलगा स्वामी असे दोघांना सोबत घेऊन घरातून बाहेर पडली. दुपारी गेलेल्या पूजा काळे सायंकाळ झाली तरी घरी परतल्या नाही. तिघेही घरी न परतल्याने कुटुंबियांसह नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली.

विहिरीत तरंगताना दिसले तिघांचे मृतदेह

गावात सगळीकडे शोध घेतल्यानंतर काहीजणांनी शंका उपस्थित केल्यानं चांगेफळ शेतशिवारात तिघांचा शोध घेण्यात आला. यावेळी शिवारातीलच एका विहिरीत महिलेसह तिघांचे मृतदेह विहिरीत तरंगलेल्या अवस्थेत आढळून आले. ही वार्ता गावात पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

सदर घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, उपनिरीक्षक गणेश नावकार, सहाय्यक उपनिरीक्षक बाळकृष्ण येवले, आदिनाथ गाठेकर, विलास नाफडे आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दोन लेकरांसह आईचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. घटनेचा पंचनामा करण्यात आल्यानंतर तिघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. आत्महत्येचं कारण कळू शकलं नाही. दरम्यान, प्रकरणाचा तपास चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ करीत आहेत.

    follow whatsapp