Ashok Chavan : खरंच अशोक चव्हाण सोनिया गांधींसमोर रडले का?

मुंबई तक

18 Mar 2024 (अपडेटेड: 18 Mar 2024, 02:46 PM)

Ashok Chavan News : राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यावर अशोक चव्हाण यांनी काय खुलासा केला आहे?

follow google news

Ashok Chavan Rahul Gandhi : "या राज्यातील एक वरिष्ठ नेता माझ्या आईला सडून सांगत होता की, मला तुरूंगात जायचं नाही", असे विधान राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत केले. त्यांच्या या विधानामुळे काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांचं नाव चर्चेत आले. आता यावरच चव्हाणांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 

हे वाचलं का?

काँग्रेसचा नेता सोनिया गांधींसमोर रडला... दोन नेते, दोन विधाने

राहुल गांधी यांनी सभेत बोलताना सांगितले की, "याच राज्याचा एक वरिष्ठ नेता काँग्रेस पक्षाला सोडतात आणि माझ्या आईला रडून सांगतात की, सोनियाजी मला लाज वाटतेय की, माझ्यात या लोकाशी, या शक्तीशी लढण्याची हिंमत नाहीये. मला तुरुंगात जायचे नाही", अशी पडद्यामागची गोष्ट राहुल गांधींनी सभेत सांगितली. 

पुढे ते म्हणाले की, "आणि हे एक नाहीत. असे हजारो लोक आहेत, ज्यांना घाबरवले गेले आहे. तुम्हाला काय वाटतंय की, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असेच गेले. नाही, ज्या शक्तीबद्दल मी बोलतोय, त्या शक्तीने त्यांना भाजपकडे नेले आहे. ते सगळे घाबरून गेले आहेत." 

अशोक चव्हाण यांनी काय मांडली भूमिका?

राहुल गांधी यांच्या विधानानंतर राज्यात अशोक चव्हाण यांचं नाव चर्चेत आले. त्यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण म्हणाले, "राहुल गांधींनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. राहुल गांधी जे काही बोललेत ते माझ्याबद्दल असेल तर ते हास्यास्पद आणि तर्कहीन आहे. कारण मी सोनिया गांधी यांना कधीही भेटलो नाही."

"मी सोनिया गांधींना भेटून माझी काहीतरी भावना व्यक्त केल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं. परंतु, ते वक्तव्य चुकीचं आहे. राहुल गांधी यांचं ते वक्तव्य दिशाभूल करणारे असून, त्यात तथ्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, मी काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत काम केलं आहे. त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत पक्ष सोडण्याची माहिती कोणालाच नव्हती आणि हे वास्तव आहे", असं अशोक चव्हाण प्रकरणावर म्हणाले आहेत. 

"मी ज्या दिवशी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याचवेळी ही माहिती बाहेर पडली. आमदारकीच्या राजीनाम्यानंतर मी पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. परंतु, मी राजीनामा देईपर्यंत याबाबतची कोणालाही माहिती नव्हती. त्यामुळे मी अगोदरच सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना कळवल्याचं जे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलंय ते चुकीचं आहे. ते वक्तव्य माझ्याबद्दल असेल तर ते हास्यास्पद आणि तथ्यहीन आहे", असं चव्हाण यांनी म्हटले आहे. 

    follow whatsapp