Shrinivas Pawar : "याच्यासारखा नालायक माणूस नाही", अजित पवारांवर सख्खा भाऊच संतापला

मुंबई तक

18 Mar 2024 (अपडेटेड: 18 Mar 2024, 10:07 AM)

Shrinivas Pawar Speech Video on Ajit Pawar : अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला आता त्यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी विरोध केला आहे. त्याचे काटेवाडी येथील भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

follow google news

Shrinivas Pawar Ajit Pawar : (वसंत पवार, बारामती) "वयस्कर झालेल्य माणसाची किंमत करत नाही. कारण आपल्याला पुढची १० वर्षे दुसऱ्याकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा (अजित पवार) नालायक माणूस नाही", असे म्हणत अजित पवारांवर त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे चांगलेच संतापले. (Srinivas Pawar expressed anger over Ajit Pawar's rebellion against Sharad Pawar ) 

हे वाचलं का?

अजित पवार यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत बंड केले. या बंडाबद्दल प्रथमच त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी भूमिका मांडली. श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना नालायक माणूस म्हणत संताप व्यक्त केला आहे. 

काटेवाडीतील ग्रामस्थांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की, मी दादांच्या (अजित पवार) विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. चांगला काळ असेल, वाईट काळ असू दे, नेहमी दादांच्या (अजित पवार)बरोबर राहिलो. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली. दादाची माझी चर्चा झाली, त्यावेळी मी त्याला म्हटलं की, आमदारकीला तू आहेस, तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे."

श्रीनिवास पवारांनी टोचले अजित पवारांना फटकारले

अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, "जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही. ज्यांना कुणाला काही पदे मिळाली, ती साहेबांमुळे (शरद पवार) मिळाली. साहेबांना कीर्तन करा, घरी बसा म्हटलेलं मला काही पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले. औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते. तशी नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. वाईट वाटून घ्यायचं नाही. मला दबून जगायचं नाही. जगायचं तर स्वाभिमानाने. जे लाभार्थी आहेत, त्यांच्यामागे जायचं मला वाटत नाही", अशा शब्दात श्रीनिवास पवारांनी अजित पवारांना सुनावले आहे.

"असा काका मला मिळाला असता, तर मी खुश झालो असतो..."

श्रीनिवास पवार पुढे म्हणाले की, "साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारला? ज्या साहेबांनी (शरद पवार) आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले. 25 वर्ष मंत्री केलं. मला जर असा काका मिळाला असता, तर मी खुश झालो असतो. ही सगळी चाल भाजपची आहे. भाजपला शरद पवारांना संपवायचे होते. घरातील व्यक्ती बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो."

अजित पवारांना इशारा

"घरातील माणूस घरच्यांना माहीत नाही. साहेबांना एकुलती एक मुलगी आहे. मला हे अजिबात पटलं नाही. साहेब जर दहा वर्ष जुने असते तर कळलं असतं. साहेबांनी काय केलं असतं? वय वाढलं म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका", असा इशारा श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना दिला. 

"माझ्या वयाची माणसे लाभार्थी आहेत. तरूण पिढी म्हणते पुढचे पुढे बघू. साहेब कधी कुणाला आवाज चढवून बोलले का? 20-25 वर्षे साहेबांनी राज्य सोपवलं होतं आणि ते दिल्लीत होते. मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे. वीस वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमन मला सोडत नाही. आपण खेडेगावातील माणसे आहोत. आपण मरेपर्यंत आई-वडिलांना सांभाळतो, त्यांचे औषध पाणी करतो", असे श्रीनिवास पवार म्हणाले.

    follow whatsapp