भारत U-19 World Cup च्या अंतिम फेरीत, उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियावर केली मात

मुंबई तक

• 03:20 AM • 03 Feb 2022

कॅरेबिअन बेटांवर सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. उपांत्य सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी मात केली. कर्णधार यश धुलचं धडाकेबाज शतक, शेख रशिदची ९४ धावांची खेळी आणि गोलंदाजांनी केलेली चमकदार कामगिरी हे भारतीय संघाच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. WHAT. A. PERFORMANCE! ? ? India U19 […]

Mumbaitak
follow google news

कॅरेबिअन बेटांवर सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. उपांत्य सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी मात केली. कर्णधार यश धुलचं धडाकेबाज शतक, शेख रशिदची ९४ धावांची खेळी आणि गोलंदाजांनी केलेली चमकदार कामगिरी हे भारतीय संघाच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं.

हे वाचलं का?

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतू ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर भारतीय संघाची सुरुवात थोडीशी अडखळत झाली. सलामीवीर अंरक्षिक रघुवंशी आणि हर्नुर सिंग हे झटपट माघारी परतले. २ बाद ३७ अशा अवस्थेत अडकलेल्या भारतीय संघाला कर्णधार यश धुल आणि शेख रशिदने आधार दिला. दोघांनीही मैदानावर जम बसवत सर्वात आधी भारताची पडझड थांबवली.

मैदानात तळ ठोकल्यानंतर दोघांनीही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. धुल आणि रशिगने फटकेबाजी करत धावा जमवण्यास सुरुवात केली. २०४ धावांच्या भागीदारीमध्ये यश धुलने आपलं शतक साजरं केलं. ही जोडी मैदानावर जम बसवून कांगारुंना नामोहरम करणार असं वाटत असनाताच यश धुल रनआऊट झाला. त्याने ११० रन्सची खेळी केली. यानंतर शेख रशिदला आपलं शतक पूर्ण करण्याची संधी होती परंतू तो देखील ९४ धावांवर माघारी परतला.

महाराष्ट्राचा राजवर्धन हांगर्गेकरही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात झटपट माघारी परतला. यानंतर निशांत संधु आणि दिनेश बाना यांनी भारताला २९० धावांचा टप्पा गाठून दिला. ऑस्ट्रेलियाकडून निस्बेत आणि साल्झमनने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला पहिल्याच षटकांमध्ये धक्का देण्यात भारताला यश आलं. टेग्यु विलीला आऊट करत रवी कुमारने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. परंतू यानंतर केलावे आणि मिलर जोडीने भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी झाली. ही जोडी भारताला सतावणार असं वाटत असतानाच रघुवंशीने मिलरला आऊट करत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. पाठोपाठ केलावेही विकी ओत्सवालच्या गोलंदाजीवर आऊट झाला. यानंतर कर्णधार कूपर कॉनलेही स्वस्तात माघारी परतला.

यानंतर मधल्या फळीतल्या लाचन शॉने मैदानात जम बसवत भारताला चांगलं झुंजवलं. परंतू तोपर्यंत भारतीय गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढला होता. ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांना भारताने गुंडाळायला सुरुवात केली. शॉने आपलं अर्धशतक पूर्ण केलं खरं, परंतू भारतीय गोलंदाजीसमोर त्याची डाळ शिजू शकली नाही. अखेरीस ऑस्ट्रेलियाला १९४ धावांत गुंडाळून भारताने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. भारताकडून विकी ओत्सवालने ३, रवी कुमार आणि निशांत सिंधूने प्रत्येकी २-२ तर कौशल तांबे आणि अंगरिक्ष रघुवंशीने १-१ विकेट घेतली.

    follow whatsapp