WTC Final : पहिला मान न्यूझीलंडचा, Team India वर मात करत जिंकली टेस्ट चॅम्पिअनशीप

मुंबई तक

• 05:35 PM • 23 Jun 2021

पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचं विजेतेपद केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने दिमाखात आपल्या नावावर केलं आहे. साऊदम्प्टनच्या मैदानावर राखीव दिवशी झालेल्या खेळात न्यूझीलंडने भारताने दिलेलं १३९ रन्सचं टार्गेट ८ विकेट राखून पूर्ण केलं. तब्बल २१ वर्षांनी न्यूझीलंडच्या संघाने आयसीसीची महत्वाची स्पर्धा जिंकली आहे. २००० साली न्यूझीलंडने चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली होती. पहिल्या ५ दिवसांपैकी २ दिवस पावसामुळे […]

Mumbaitak
follow google news

पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचं विजेतेपद केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने दिमाखात आपल्या नावावर केलं आहे. साऊदम्प्टनच्या मैदानावर राखीव दिवशी झालेल्या खेळात न्यूझीलंडने भारताने दिलेलं १३९ रन्सचं टार्गेट ८ विकेट राखून पूर्ण केलं. तब्बल २१ वर्षांनी न्यूझीलंडच्या संघाने आयसीसीची महत्वाची स्पर्धा जिंकली आहे. २००० साली न्यूझीलंडने चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली होती.

हे वाचलं का?

पहिल्या ५ दिवसांपैकी २ दिवस पावसामुळे वाया गेल्यामुळे आधीच या सामन्याच्या आयोजनावर क्रिकेटप्रेमी नाराज होते. परंतू शेवटच्या दोन दिवसांमध्ये भारतीय फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय चाहते आणखीनच हताश झाले. २०१९ पासून सुरु झालेल्या टेस्ट चॅम्पिअनशीप स्पर्धेत भारताने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. परंतू महत्वाच्या सामन्यात दिग्गज खेळाडूंनी केलेली निराशा भारताच्या पराभवाचं मोठं कारण ठरली.

पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. विराट कोहली-रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे यांच्या छोटेखानी कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या इनिंगमध्ये २१७ पर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचा संघ पहिल्या इनिंगमध्ये २४९ रन्सपर्यंत पोहचू शकला. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेली ३२ रन्सची आघाडी न्यूझीलंडला पुढे कामी आली.

पावसामुळे वाया गेलेले दोन दिवस आणि उरलेल्या दिवसांमध्ये अंधुक प्रकाशामुळे लवकर थांबवावा लागलेला खेळ यामुळे हा अंतिम सामना राखीव दिवसापर्यंत ढकलला जाणार हे स्पष्ट झालं होतं. अखेरच्या दोन दिवसांमध्ये पावसाने उसंत घेतली. न्यूझीलंडच्या बॉलर्सनी शिस्तबद्ध मारा करत दुसऱ्या इनिंगमध्ये भारताची दाणादाण उडवली. ऋषभ पंत आणि रोहित शर्माचा अपवाद वगळता एकही भारतीय बॅट्समन दुसऱ्या डावात आश्वासक खेळी करु शकला नाही. ज्यामुळे भारताने १७० रन्सपर्यंत मजल मारत न्यूझीलंडला विजयासाठी १३९ रन्सचं आव्हान दिलं.

अखेरच्या दिवशी ६० ओव्हर्सचा खेळ बाकी असताना भारताला संयमी खेळ करण्याची गरज होती. परंतू ऋषभ पंतसह अखेरच्या फळीतल्या बॅट्समननी विकेट फेकत न्यूझीलंडसमोर आव्हान सोपं करुन ठेवलं. रविचंद्रन आश्विनने दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट घेत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परंतू अनुभवी रॉस टेलर आणि केन विल्यमसन यांनी महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

    follow whatsapp