Lok sabha Election 2024: ‘घड्याळ’ नको तर ‘कमळ’ हवं, माजी IAS अधिकाऱ्याची थेट मागणी?
Pravin Pardeshi Dharashiv lok Sabha Election: धाराशिवमध्ये ओमराजेंविरोधात माजी सनदी अधिकारी प्रविण परदेशी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांना घड्याळ चिन्हाऐवजी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.
ADVERTISEMENT
Omraje Nimbalkar vs Pravin Pardeshi: निलेश झालटे, धाराशिव: लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होताहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज भरायची लगबगही सुरु झाली आहे. असं असलं तरी अजून बऱ्याच जागांवर उमेदवार घोषित झालेले नाहीत. पाच टप्प्यांपैकी तिसरा टप्प्यात काही रंगतदार लढती असणार आहेत. याच टप्प्यात 7 मे रोजी धाराशिव लोकसभेचं रणांगण देखील तापणार आहे. निवडणुका घोषित होण्याआधीपासूनच तसंतर काही जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पेच सुरु झाला आहे. हा पेच आता वाढत चाललाय. महायुतीत सातारच्या जागेनंतर आता धाराशिवच्या जागेवरुन तिढा निर्माण झाला आहे. (ex ias officer pravin pardeshi is likely to contest lok sabha election 2024 from dharashiv he wants to contest election on bjp lotus symbol)
ADVERTISEMENT
धाराशिवमध्ये साताऱ्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक उमेदवार थेट राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणुका लढवण्यास इच्छुक नसल्यानं हा तिढा अधिक वाढला आहे. त्यामुळं साताऱ्यापाठोपाठ धाराशिवमध्ये महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत. धाराशिवच्या रणांगणात नेमकं काय राजकारण घडतंय हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
धाराशिवमधील नेमकं गणित काय?
महायुतीत दादांच्या राष्ट्रवादीला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. यात बारामती, शिरुर, रायगड, नाशिक, धाराशिव मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकतात. धाराशिवमधून माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी लढण्यास इच्छुक आहेत. पण त्यांना भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. पण जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असल्यानं त्यांची गोची झाली आहे.
हे वाचलं का?
माहिती अशी आहे की, राष्ट्रवादीनं प्रवीण परदेशी यांना घड्याळाच्या लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण परदेशी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायला तयार नाहीत. त्यांना भाजपकडूनच निवडणूक लढवायची असल्यानं धाराशिवमध्ये तिढा निर्माण झाला आहे.
लोकसभेसाठी कधी काळी काँग्रेसचा गड मानला जाणारा हा मतदारसंघ. मात्र 1999 पासून केवळ एकवेळचा अपवाद वगळता इथं शिवसेनेनं जो कब्जा केलाय तो आजवर कायम आहे. आतापर्यंत युतीत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटतो. भाजपला अजूनतरी हा मतदारसंघ वाट्याला आलेला नाही. मात्र, यावेळी भाजपनं इथं जोरात ताकद लावली आहे. असं असलं तरी हा मतदारसंघ आता दादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असल्याचं बोललं जातं आहे.
ADVERTISEMENT
मतदारसंघात चांगला प्रभाव पाडणाऱ्या ओमराजेंच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी युती प्रयत्नात आहे. हा तगडा उमेदवार म्हणून राणा जगजीतसिंह पाटलांचं नाव आघाडीवर होतं. मात्र, राणांची लोकसभा लढण्याची तयारी आणि त्यांना तानाजी सावंतांचा झालेला विरोध पाहता इथं फडणवीस वेगळा डाव खेळू शकतात असं बोललं जातंय. हा डाव आहे माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या नावाचा. प्रवीण परदेशींना धाराशिवमधून मैदानात उतरवण्याची तयारी भाजप करतंय अशी माहिती समोर आली होती. परदेशींकडून देखील इथं चाचपणी आणि तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरु केली आहे.
ADVERTISEMENT
महायुतीत ही जागा कुणाला सुटते हा खरंतर सवाल आहेच. इथं आधीपासूनच तानाजी सावंत शिवसेनेची जागा म्हणून आडवे उभे आहेत. गेल्यावेळी इथं राष्ट्रवादीत असलेल्या राणांना ओमराजेंनी पराभूत करत लोकसभा गाठली होती. त्यानंतर राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुळजापुरातून विधानसभा मिळवली. लोकसभेसाठी खरं तर भाजपकडे त्यांच्याइतका तगडा उमेदवार मतदारसंघात नाही. मात्र, त्यांना होणारा विरोध आणि गेल्यावेळचा पराभव पाहता त्यांना उमेदवारी देण्याऐवजी नवा चेहरा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.
आता प्रवीण परदेशींच्या नावाची चर्चा होताना दिसतेय. धाराशिव लोकसभेसाठी प्रवीण परदेशी यांचे एकप्रकारे राजकीय लॉंचिंग, चाचपणी केली जात आहे. परदेशी हे किल्लारीला भूकंप झाला त्या काळात लातूरचे जिल्हाधिकारी होते. धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असून त्याचा आधार घेत विविध शासकीय योजना अंमलबजावणीसाठी त्यांचा धाराशिव जिल्ह्यातील वावर वाढला आहे. प्रशासकीय बैठका, महिला मेळावे, आढावा बैठक तसेच गाठीभेटी यावर त्यांनी भर दिलाय. फडणवीस यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाचा कारभार पाहिला आहे. सेवानिवृत्तीनंतर सरकारनं त्यांची 'मित्रा' या प्रकल्पावर नेमणूक केली आहे.
दरम्यान, धाराशिवसाठी परदेशी कसे योग्य आहेत अशा आशयाचे रील्स आणि व्हिडीओ मतदारसंघात व्हायरल होताना दिसत आहेत. प्रसिद्धी, दांडगा जनसंपर्क, आक्रमकता आणि लोकांची अचूक नस पकडणे हा खासदार ओमराजेंचा यूएसपी मानला जातो. शिवाय महाविकास आघाडी म्हणून फाईट झाली तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंप्रतीची सहानुभूती हा फॅक्टरही ओमराजेंसाठी इथं अतिशय पोषक ठरणार आहे. त्यामुळं ओमराजेंसमोर माजी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या रुपानं एक वेगळा चेहरा देण्याचा युतीचा प्रयत्न आहे अशी चर्चा होतेय. मात्र परदेशी घड्याळावर लढण्यास इच्छुक नसल्याचं कळतंय. परदेशी जर मैदानात उतरले तर त्यांना निवडून आणण्यासाठी फडणवीस आपली सगळी ताकद एकवटू शकतात. सहापैकी पाच मतदारसंघात सध्या महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळं फडणवीस, अजितदादा आणि शिंदेंची ताकद मिळाल्यास परदेशी हे ओमराजेंसमोर तगडा पर्याय ठरु शकतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT