Zombivali Film Review : झोंबीचा प्लॉट जरी चांगला असला तरी अपेक्षित परिणाम साधू न शकलेला ‘झोंबिवली’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

झोबिंवली या नावावरूनच आपण सगळ्यांनीच हे ओळखलं होतं की झोंबी आता हॉलिवूड, बॉलिवूडनंतर मराठी सिनेमात येत आहेत.. पण या सिनेमातले झोंबी थेट आपल्या डोबिंवलीमध्ये आले आहेत.. आता या गजबजलेल्या डोबिंवलीत चालायला जागा नाही आणि तिथे हे झोंबी काय करतायत.. तर त्याची ही धमाल गोष्ट म्हणजे झोंबिवली….

डोबिंवली मध्य रेल्वेवरचं एक महत्वाचं स्टेशन, एक महत्वाचं शहर, इथला चाकरमानी रोज आपल्या पोट्यापाण्यासाठी ट्रेनचे धक्के खात मुंबईच्या पोटात इमानेइतबारे येत असतो.. डोबिंवली हे शहर सांस्कृतिक असलं तरी पाण्याचे प्रश्न, अनधिकृत बांधकामं, रस्ते, अश्या आणि कैक प्रश्नांनी आधीच ग्रासलेलं आहे. आता आधीच बेहाल झालेल्या डोबिंवलीकरांच्या मानगुटीवर झोंबी येऊन बसले तर… पण हो या झोंबीनी अगला स्टेशन डोबिंवलीवर अँटॅक केला आहे.. तर फास्टर फेणे फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने हे झोंबी डोबिंवलीवर सोडले आहेत..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तर होतं असं मित्रांनो की आपला अमेय वाघ म्हणजेच सिनेमातील सुधीर जोशी… इंजिनियर असलेला मध्यवर्गीय व्हँल्यू वगैरे पाळणारा हा जोशी आपली प्रेग्नंट बायको सपना हिच्यासोबत डोबिंवलीतील एका टुमदार अश्या टॉवरमध्ये राहायला येतो.. ज्या टॉवरच्या मालकाने आधीच इथल्या रहिवाश्यांना अनेक सुविधांनी नटलेलं असं तुमचं घर असेल असं मस्त चॉकलेट दिलं आहे. या टॉवरला पाण्याची मारामार आहे. हे कमी की काय या छान छान टॉवरच्या समोरच पसरलेली जनता नगर झोपडपट्टी आहे. या टॉवरचा मालक मुसळेची एक मिनरल वॉटरची फँक्टरी आहे. ज्यात आपले सुधीर जोशी इंजिनियर म्हणून काम करत असतात. समोरच्या जनता नगर झोपडपट्टीतला स्थानिक युवा नेता विश्वास आणि मुसळेमध्ये आधीपासूनच ३६ चा आकडा असतो. कारण मुसळेच्या मिनरल वॉटर फँक्टरीमुळे जनता नगर झोपडपट्टीतील रहिवाश्यांचं अतोनात नुकसान झालेलं असतं आणि त्या भागात पाण्याची मारामार झालेली असते. तर एकदा होतं असं की या जनता नगरमध्ये झोबीं यायला सुरवात होतात. वस्तीतल्या जवळपास प्रत्येकावरच झोबींचं आक्रमण होतं आणि हळूहळू समोरच्या मुसळेच्या टॉवरपर्यंत झोबींचं आक्रमण होतं. यात सुधीर त्याची बायको, विश्वास,टॉवरमधले काही शेजारी आणि झोपडपट्टीतील काही माणसं इतकीच झोबींच्या तावडीतून वाचलेली असतात पण त्यांना या झोबींचा मुकाबलाही करायचा आहे आणि झोबींच्या तावडीतून डोबिंवलीलाही वाचवायचं आहे.. मग सुधीर,सपना, विश्वास आणि मंडळी झोबींच्या तावडीतून डोबिंवलीला वाचवतात का? आणि मुळात झोंबीच्या तावडीतून ते सुटतात का? हे पाहण्यासाठी तुम्हांला झोंबिवली पाहण्याची एकदा तरी गरज आहे…

ADVERTISEMENT

तर झोबिंवली, झोंबी हा विषय मराठी सिनेमात तरी पहिल्यांदाच आलाय आणि याचं क्रेडिट आदित्य सरपोतदारला द्यावच लागेल.. सिनेमाचा विषय वेगळा असला,त्याची ट्रीटमेंट वेगळी असली, सिनेमातल्या कलाकारांची कामं छान असली तरी झोबिंवली खिळवून ठेवण्यात जरा कमी पडलाय.. आदित्य सरपोतदार एक उत्तम दिग्दर्शक आहे यात वाद नाही. पण झोबिंवलीमध्ये तो ६० टक्के यशस्वी झालाय. याचं महत्वाचं कारण म्हणजे सिनेमाचा नायक झोंबी… झोंबींनी एका शहरावर आक्रमण केलं आहे आणि त्यांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी जे गडी उरले आहेत त्यांचा झोंबीपासूनचा बचाव हा सिनेमात फारसा दिसलाच नाही.. झोंबीनी अँटँक केल्यावर प्रेक्षकाला अपेक्षित असलेलं भय,तो थरार सिनेमात तितकासा आणता आलेला नाही.. झोबिंवली तुमचं मनोरंजन करतो मात्र तो १०० टक्के तुम्हांला आनंद देऊ शकत नाही.. या सिनेमाची कथा वेगळी असली तरी या सिनेमातील संवाद, पटकथा त्या कथेचा अपेक्षित परिणाम आणू शकलेली नाही. बरं हा थरार आहे, कॉमेडी आहे नेमकं आहे तरी काय या संभ्रमात आपण प्रेक्षक म्हणून कायम प्रश्नार्थक राहत असतो. आणि त्यामुळे प्लॉट चांगला जरी असला तरी त्यावरचं बांधकाम मात्र आदित्य सरपोतदार तितकं भक्कम करू शकलेले नाहीत…

ADVERTISEMENT

हा सिनेमा जर कुठे मजा आणतोय तर अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहकलाकारांमुळे …सुधीर जोशी,सपना जोशी आणि विश्वासच्या कँरेक्टरमध्ये या तिनही कलाकारांनी कमाल काम केलं आहे.. तिघांनीही याप्रकारची भूमिका आधी केलेली नाही त्यामुळे या तिघांकडून ते पाहणं आपल्याला गंमत वाटत राहते. विशेष उल्लेख वैदही परशुरामीचा की तिला अजूनही इतकी मोठी भूमिका याआधी मिळाली नव्हती. त्यामुळे तिच्या अभिनयाचे रंग अजूनही पाहिजे तितके लोकांनी पाहिले नव्हते. पण झोबिंवलीमुळे वैदेही किती परिपूर्ण अभिनेत्री आहे याचा प्रत्यय तुम्हांलाही सिनेमा पाहून जाणवेल. अमेय आणि ललित हे आता माहिर कलाकार आहेत.. पिच कोणतंही असो जाऊन चोपायचंच असं या दोघांचं आहे त्यामुळे आपल्या वाट्याला आलेलं कँरेक्टर या दोघांनी खणखणीत चोपलंच आहे.. सहकलाकारांमधली तृप्ती खामकर ही अभिनेत्री उजवी ठरते. तिने छोट्या छोट्या प्रसंगात दिलेलं अफलातून टायमिंग लाजवाब आहे. बाकी कलाकारांचीही उत्तम साथ मिळाली आहे.. पण पण तरीही नुसत्या अभिनयाने सिनेमा तारला जाऊ शकत नाही.. मराठीत हे खूपदा होतंय की मराठी सिनेमाच्या कथा जरी भन्नाट असल्या तरी एक्सीक्युशन लेव्हलला गेल्यावर याच कथांना उतरती कळा का लागते याचा विचार व्हायला हवा… आदित्य सरपोतदारने नवीन वेगळा विषय आणला याबद्दल त्याचं कौतुकच पण तो विषय अपेक्षित परिणाम साधू शकला नाही…सो तसाही २६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत झोबिंवली सोडला तर कोणताच सिनेमा रिलीज होत नाहीये.. त्यामुळे या झोबींना थिएटर्समध्ये जाऊन एकदा तरी पाहायला काहीच हरकत नाहीये.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT