महाराष्ट्रातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत अशी घोषणा आज उच्च तंत्र शिक्षण उदय सामंत यांनी केली आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय असणार आहेत. 50 टक्के उपस्थितीसह ही महाविद्यालयं सुरु कऱण्यात येणार आहेत. यावर्षी 75 टक्के उपस्थितीचं बंधन विद्यार्थ्यांना नाही असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. महाविद्यालयं सुरु करताना कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळले जाणं बंधनकारक असणार आहे असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.
कोरोना अद्याप संपलेला नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आला आहे. तसंच लसीकरणही सुरु कऱण्यात आलं आहे. जून महिन्यापर्यंत आणखी एक लस येण्याचीही शक्यता आहे. अनलॉकच्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू सगळं चक्र पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु झाले आहेत हेच या निर्णयांमधून दिसतं आहे.
राज्यातील महाविद्यालयं मागील वर्षी मार्च महिन्यापासून बंद करण्यात आली. कोरोना आणि लॉकडाऊन यांच्या पार्श्वभूमीवर 10 वी, 12 वी आणि पदवी परीक्षाही रद्द करण्यात आल्या. आता सरकारने महाविद्यालयांच्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु केली जाणार आहेत असं उदय सामंत यांनी आज जाहीर केलं.
काही वेळापूर्वीच त्यांन यासंदर्भातली पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये ही माहिती दिली. राज्यातील महाविद्यालयं कधी सुरु होणार हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होताच. आधी लॉकडाऊन करण्यात आला असला तरीही नंतर अनलॉकमध्ये अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या. काही दिवसांपूर्वीच शाळाही सुरु कऱण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आता महाविद्यालयंही सुरु केली जाणार असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. वेळापत्रक कसं असेल? कुठले वर्ग सुरु करायचे? तसंच इतर ज्या काही शैक्षणिक बाबी असतील त्यासंदर्भातले अधिकार हे विद्यापीठांना देण्यात आले आहेत. महाविद्यालयं सुरु होणार असली तरीही कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं हे बंधनकारक असणार आहे असंही उदय सामंत यांनी सांगितलं.
पाहा उदय सामंत यांची मुलाखत