केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या आज संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. २०२० हे वर्ष जगाप्रमाणेच भारतासाठीही खडतर गेलंय. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेला बसलेला फटका, लॉकडाउन काळात अर्थव्यवस्थेवर आलेला ताण, सीमेवर भारत-चीन लष्करांमध्ये झालेला संघर्ष या सर्व पार्श्वभूमीवर सितारामन आज अर्थसंकल्पात नेमक्या काय तरतूदी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज ट्विट करुन सितारामान यांना काही विशेष गोष्टींवर लक्ष द्यायला सांगितलं आहे. छोटे व्यापारी, शेतकरी आणि नोकरदारांना मदत, आरोग्य सेवेवर अधिक खर्च आणि सीमेवरील जवानांच्या सोयीसाठी संरक्षण क्षेत्राचं बजेट वाढवण्याचा सल्ला राहुल गांधी यांनी दिला आहे.
दरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी हा अर्थसंकल्प मदत करेल असंही ठाकूर म्हणाले. नरेंद्र मोदी सरकारच्या सबका साथ, सबका विकास आणि आत्मनिर्भर भारत या दोन उद्दीष्टांना डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचंही ठाकूर म्हणाले. घरातून निघण्याआधी ठाकूर यांनी पुजाही केली.