शिवसेनेच्या ‘रडार’वर आलेल्या सोमय्यांची फडणवीसांनी घेतली भेट; सोमय्यांनी लगेच केलं ट्वीट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या राजकीय धुमश्चक्रीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यानंतर आता शिवसेनेनं सोमय्यांविरुद्ध मोर्चा उघडला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून किरीट सोमय्या शिवसेनेच्या रडारवर आल्याचं दिसत आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्यांची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर सोमय्यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारला गर्भित इशारा दिला आहे. (Devendra Fadnavis met Kirit Somaiya)

ADVERTISEMENT

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत, अनिल परब यांच्यासह शिवसेनेच्या काही नेत्यांवर सातत्याने आरोप केले जात आहे. काही नेत्यांना तुरूंगात जावं लागणार असंही सोमय्यांकडून सातत्यानं बोललं जात आहे. सोमय्यांकडून केलेल्या जाणाऱ्या आरोपांविरुद्ध गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेनंही आघाडी उघडली आहे.

हे वाचलं का?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांच्या आरोपांना उत्तर दिलं. त्याचबरोबर सोमय्यांच्या मुलाचं नावं घेत आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोपही केले. त्यानंतर आजही संजय राऊत यांनी एक ट्वीट करत सोमय्यांना 260 कोटींच्या प्रोजेक्टबद्दल प्रश्न विचारला आहे. शिवसेनं सोमय्यांविरुद्ध अचानक आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे फडणवीसांनी घरी सोमय्यांची भेट घेतल्यानं तर्कविर्तकांना उधाण आलं आहे.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतल्यानंतर सोमय्यांनीही फडणवीसांचे आभार मानत सरकारला गर्भित इशारा दिला आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी आज आमच्या निवासी कार्यालयात येऊन आमचं धैर्य, हिम्मत वाढवली. त्यांचे आभारी आहोत. घोटाळे मुक्त महाराष्ट्र हा आपला निर्धार आहे”, असं सोमय्यांनी या भेटीचा व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

संजय राऊत सोमय्यांना उद्देशून काय म्हणाले?

“भ्रष्टाचाराच्याविरुद्ध लढणारे नवीन महात्मा जन्माला आलेले आहेत. जे दलाली करतात, केंद्रीय तपास यंत्रणांची. आम्ही त्यांना आवाहन करतो. तुम्ही (किरीट सोमय्या) जो केंद्रीय मंत्र्यांचा (नारायण राणे) हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार काढला आहे ना? ती लढाई पुढे घेऊन चला. आमच्याकडेही काही कागदपत्रं आहेत, ते आम्ही तुम्हाला देतो. त्या केंद्रीय मंत्र्यांच्या ३०० कोटींचा घोटाळा… ती लढाई शेवटाला नेण्यासाठी सोमय्यांना आम्ही आवाहन करतो. तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही सच्चे असाल, तर ही लढाई पुढे न्याल. नाहीतर या विषयावर शेपूट घालून बसला आहात? ती शेपूट आम्ही बाहेर काढू. हे ढोंग… ही नौटंकी बंद करा,” खासदार संजय राऊत म्हणाले.

“भाजप आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि देश कसा लूटला आहे. ही लुट लपवण्यासाठी आमच्यावर आरोप केले जात आहेत. भाजपने केलेल्या लुटीचा पर्दाफाश व्हायला सुरूवात झाली आहे. तुमच्या भ्रष्टाचाराचे हिशोब आता तुम्हीच करत बसा”, असा इशारा राऊतांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्यांना दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT