“शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकणार नाही” संजय राऊत यांचं तुरुंगातून आईला पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. शिवसेनेत इतक्या मोठ्या घडामोडी घडत असताना शिवसेनेची मुलुख मैदान तोफ अशी ओळख असणारे संजय राऊत तुरुंगात आहेत. आज त्यांनी त्यांच्या आईला पत्र लिहिलं आहे. या पत्राची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. मी नक्कीच परत येईन असा विश्वास त्यांनी या पत्रात व्यक्त केला आहे. तसंच भाजपला टोलेही लगावले आहेत.

ADVERTISEMENT

काय आहे संजय राऊत यांनी आईला लिहिलेलं पत्र?

प्रिय आई,

जय महाराष्ट्र!

हे वाचलं का?

खूप वर्षं पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज सामनासाठी अग्रलेख लिहिल होतो, पण दौऱ्यावर नसेन तेव्हा तू आणि रोजच भेटत होतो. दौऱ्यावर असताना सकाळ-संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचं राहून गेलं. आता हे पत्र लिहण्याची संधी केंद्र सरकारने दिली.

आत्ताच माझी ईडी कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जायच्या आधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहित आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आलाय.

ADVERTISEMENT

१ ऑगस्टला ईडीचे अधिकारी घुसले

रविवारी १ ऑगस्टला ईडीचे अधिकारी घरी घुसले तेव्हा तू मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे बसून होतीस. तुझ्या खोलीची आणि देवघराची तसंच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्या डब्यांचीही झडती घेतली तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस, हा प्रसंग आपल्यावर येणारच आहे हे बहुदा मनात पक्के केले होतेस. पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मिठी मारली आणि रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला. बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. लवकर परत ये म्हणालीस खिडकीतून मला हात केलास. जसा तू रोज सामनात किंवा दौऱ्यावर जाताना करतेस. त्या कठीण परिस्थितीतही तू अश्रू रोखून बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केला. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही

आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि महिनोन महिने घरी येत नाहीत. काहीजण तर कधीच येत नाहीत. लढाई अशीच असते. मलाही अन्यायापुढे, शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावं लागलं आहे. हा कणखरपणा आणि कठोरपणा मी तुझ्याकडूनच घेतला नाही काय?

भुजबळ, राणे शिवसेना सोडून गेले तेव्हा तुझ्यातला त्रागा मी पाहिला आहे. आता पुन्हा शिंदे नावाचा गट फुटून उद्धव ठाकरेंवर हल्ले करू लागला तेव्हा काहीतरी करा, शिवसेना वाचवा हे सांगणारी तूच होतीस. हे लोक का फुटले? यांना काय कमी पडलं होतं? असाही प्रश्न तू बातम्या पाहून विचारत होतीस. शिवसेना वाचवायची म्हणजे लढावंच लागेल. प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच घरात का जन्माला यावा? हा प्रश्न असतोच.

शिवसेनेचं आणि स्वाभिमानाचं बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतलं

शिवसेनेचे आणि स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतलं. मऱ्हाठी बाणा तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी आणि बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही हे तूच आमच्या मनावर कोरलंस. मग आता मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात संजय कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुला मान्यच झालं नसतं. ईडी, इन्कम टॅक्स वगैरेच्या भयाने बरेच आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेइमानांच्या यादीत जायचं नाही. कोणीतरी खंबीरपणे उभं ऱाहायालाच हवं. माझ्यात ती हिंमत आहे. ही हिंमत माननीय बाळासाहेब ठाकरे आणि तू दिलीस. सगळ्यांना माहित आहे माझ्यावर बनावट आणि खोटे आरोप लावले.

इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत आणि दबावानं गन पॉईंटवर माझ्याविरोधात बोगस स्टेटमेंट घेतली जात आहेत. अप्रत्यक्षपणे ठाकरेंची साथ सोडा असे सुचवलं जातं आहे. याच प्रकारचा जुलुम टिळक, सावरकर यांच्यासह अनेकांना भोगावा लागला. अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी घरदारांवर तुळशीपत्र ठेवलं. जायबंदी झाले, कुणी प्राण गमावले. मग हाच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावं? उद्धव ठाकरे माझे जिवाभावाचे मित्र आणि सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडलं तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?

आज कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडलं आहे. त्यांना शिवसेनेचं अस्तित्व आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवायचा आहे. पडद्यामागे बरंच काही चाललं आहे. अशावेळी मान खाली घालून, हात बांधून गुलामासारखं कसं जगता येईल? मी आत्ताच ऐकलं नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय या छळातूनच क्रांतीच्या ठिणग्या उडतील आणि नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल.

शिवसेना ही माझी आणि आपल्या सगळ्यांची आई

जशी तू माझी आई आहेस तशी शिवसेना देखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेईमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरोधात बोलू नका, महाग पडेल. या धमक्या दिल्या जात होत्या. हा दबाव आणि धमक्यांना मी भीक घातली नाही. मी आज तुझ्यापासून लांब आहे. तरीही चिंता नसावी, मी येईनच. तोपर्यंत उद्धव ठाकरे आणि असंख्य शिवसैनिक तुझी मुलं असतील. काळजी घे.

तुझाच

संजय (बंधू)

८ ऑगस्ट सत्र न्यायालय

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ८ ऑगस्टला हे पत्र लिहिलं आहे. हे पत्र काही वेळापूर्वीच ट्विट करण्यात आलं आहे. यामध्ये संजय राऊत यांनी आईशी संवाद साधत असतानाच भाजप, शिंदे गट, केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यावर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT