बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनचं कौतुक केलं होतं?; पवारांचा आरोप आणि वादाचं कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या उत्तर सभेत शरद पवारांवर निशाणा साधताना बाबासाहेब पुरंदरेंवर होणाऱ्या टीकेचा उल्लेख केला होता. त्यावर ‘ही टीका योग्यच आहे,’ असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं होतं. हे ही सर्व टीका सुरू झाली, ती जेम्स लेनच्या पुस्तकावरून. त्यामुळे जेम्स लेन आणि त्याच्या पुस्तकाचा नेमका वाद काय? महाराष्ट्रात हे प्रकरण पुन्हा का चर्चिलं जातंय? याचा घेतलेला हा आढावा…

ADVERTISEMENT

बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप काय?

राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली होती. पत्रकार परिषदेत पवार म्हणाले होते, “मी पुरंदरेबद्दल बोलल्याचं त्यांनी सांगितलं. मी बोलतो, लपून ठेवायची गरज नाही. कारण पुरंदरेंनी शिवछत्रपतींचा उल्लेख करताना जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व घडवलं या ऐवजी दादोजी कोंडदेव यांचं त्यामध्ये योगदान होतं असं विधान केलेलं आहे. असा उल्लेख केल्यानं मी विरोध केला. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व जिजाऊंनी घडवलं. त्यामुळे त्या व्यक्तिमत्त्वाच्या मोठेपणात जिजाऊंचं योगदान आहे.”

हे वाचलं का?

“बाबासाहेबांनी त्याबद्दल वेगळं लिहिलं. त्यामुळे माझा विरोध होता. आजही आहे. मी टीकाही केलीये. जेम्स लेनने लिखाण केलं. त्या लिखाणाचा आधार त्यांनी ही माहिती मी पुरंदरे यांच्याकडून घेतल्याचा स्वच्छ उल्लेख केलेला आहे. गलिच्छ अशा प्रकारचं लिखाण एका लेखकाने केलं आणि त्याला माहिती पुरवण्याचं काम तुम्ही (पुरंदरे) केलं. असं उघडपणाने तो म्हणत असेल आणि त्याचा खुलासा पुरंदरेंनी कधी केला नाही. त्यामुळे यावर टीका केली असेल, तर मला त्याचं दुःख वाटत नाही. मला त्याचा अभिमान वाटतो,” असं पवार म्हणाले होते.

पवारांच्या या आरोपानंतर मनसेनं बाबासाहेब पुरंदरे यांचं एक पत्र समोर आणलं. शरद पवारांची टीका खोडण्याचा प्रयत्न या पत्रातून केला आहे. जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी आणणारं पत्र पुरंदरे यांच्यासह काही जणांनी ऑक्सफर्ड प्रकाशनला लिहिलं होतं. आता तेच पत्र समोर आणत मनसेनं शरद पवारांना काही प्रश्न विचारले आहेत. मनसेच्या या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवारांनी सोलापूरमधील बाबासाहेब पुरंदरेंच्या भाषणाचा दाखला देत, बाबासाहेबांनी जेम्स लेनचं कौतुक केलं पुन्हा एकदा म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

प्रकरण काय?

ADVERTISEMENT

जेम्स लेन हा एक अमेरिकन लेखक होता. १९९० च्या दरम्यान तो भारतात आला, तो प्रामुख्याने महाभारताचा अभ्यास करण्यासाठी. हा अभ्यास करण्यासाठी जेम्स लेनने निवड केली ती पुण्यातील भांडारकर प्राच्याविद्या संशोधन संस्थेची. मात्र संशोधन करता करता त्याच्या लक्षात आलं की महाराष्ट्रातील जनतेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे आणि त्याचवेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहायचं नक्की केलं. या विषयावर आपला अभ्यास पूर्ण झाल्यावर जेम्स लेनचं ‘शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे पुस्तक आँक्सफर्ड प्रकाशनाने जून २००३ मध्ये प्रकाशित केलं.

सोलापूरचा उल्लेख करत पवारांनी काय केलाय आरोप?

शरद पवारांनी असं म्हटलं आहे की, जेम्स लेनचं कौतुक बाबासाहेब पुरंदरेंनी केलं आहे. पवारांच्या या म्हणण्याचा शोध घेतला असता ३ मे २०१५ ला जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं ट्विट समोर आलं. ज्यात त्यांनी २ सप्टेंबर २००३ साली दैनिक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत आलेल्या बातमीचा दाखला दिला. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या गणेशोत्सव व्याख्यानमालेत बाबासाहेब पुरंदरे यांचं भाषण झालं होतं. या भाषणात पुरंदरेनी शिवचरित्राचं महत्त्व स्वकीयांना नाही, तर परकीयांना कळतं, असं म्हटलं होतं आणि याच भाषणात त्यांनी जेम्स लेनच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता.

मात्र यानंतर बरोबर २ महिन्यांनी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त लिखाणामुळे जेम्स लेनच्या या पुस्तकाला महाराष्ट्रात विरोध वाढू लागला. बाबासाहेब पुरंदरे आणि काही मंडळींनी १० नोव्हेंबर २००३ ला ऑक्सफर्ड इंडिया प्रेस प्रकाशन संस्थेला पत्र लिहिलं. हे पुस्तक तात्काळ मागे घ्या, अशी मागणी केली होती. या पत्राला आँक्सफर्ड इंडिया प्रेसने २१ नोव्हेंबर २००३ ला म्हणजेच ११ दिवसात लगेच उत्तर दिलं. त्यांनी जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकाबाबत माफी मागितली. यानंतर जेम्स लेनने डिसेंबर २००३ ला आपल्या या वादग्रस्त पुस्तकातील लिखाणाबाबत फँक्स करत माफीनामा पाठवला.

यानंतर हे प्रकरण शांत होईल असं वाटलं होतं. पण टाईम्स आँफ इंडियाच्या बातमीनुसार शिवसेनेनं जेम्स लेनच्या या वादग्रस्त पुस्तकाबद्दल भांडारकर प्राच्याविद्या शिक्षण संस्थेला जबाबदार धरलं आणि संस्थेतील संस्कृतचे अभ्यासक श्रीकांत बहुलकर यांना २२ डिसेंबर २००३ ला काळं फासलं. या कृतीबद्दल अनेक इतिहास संशोधकांनी या घटनेचा निषेध केला.

त्यानंतर त्याकाळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे यांनी २९ डिसेंबर २००३ ला श्रीकांत बहुलकर यांची भेट घेतली आणि त्यांना काळं फासण्यात आलेल्या घटनेबद्दल माफी मागितली. हे जेम्स लेनचं प्रकरण शांत होताना दिसत असताना या वादात संभाजी बिग्रेडने उडी घेतली. संभाजी बिग्रेडने ५ जानेवारी २००४ साली भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेची तोडफोड केली. ही बातमी त्यावेळेच्या टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापून आली होती. आणि हे केस त्यानंतर बरीच वर्ष सुरू होती.

त्यानंतर २००४ साली विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्याकाळी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस यांची सत्ता होती. मात्र त्यांच्याविरोधात वातावरण होते. तसंच राज ठाकरे आणि नारायण राणे यांनीही तोपर्यंत शिवसेना पक्ष सोडला नव्हता. आपल्या विरोधातील वातावरण पाहून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आपल्या त्यावेळच्या जाहीर सभांमधून जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकाचा मुद्दा प्रचारात मांडायला सुरुवात केली. २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसला सर्वाधिक ७१ जागा मिळाल्या आणि विधानसभेतील राष्ट्रवादी कॉग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला.

यानंतर थेट २०१४ ला भाजप आणि शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर या सरकारने २०१५ मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आणि पुन्हा महाराष्ट्रात वाद पेटला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह स्वतः शरद पवारांनी पुरंदरेंना पुरस्कार देण्यास विरोध केला. काही महिन्यांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्यावर हा वाद शमेल अशी चिन्हं होती.

आता राज ठाकरेंनी ठाण्याच्या उत्तर सभेत शरद पवारांवर टीका करताना जेम्स लेनचं वादग्रस्त पुस्तक आणि बाबासाहेब पुरंदरे हा विषय पुन्हा चर्चेला आणला. आणि यावर शरद पवारांनी प्रतिउत्तर दिलं. आणि जेम्स लेनचं वादग्रस्त पुस्तक आणि बाबासाहेब पुरंदरे हे विषय पुन्हा एकदा चर्चेला यायला पुन्हा सुरवात झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT