राजभवनातील ब्रिटिशकालीन भुयारात उभारण्यात आलेलं क्रांती गाथा दालन बघितलंत का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांना समर्पित ‘क्रांती गाथा’ या भूमिगत दालनाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (१४ जून) राजभवन झालं.

हे वाचलं का?

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सन २०१६ साली राजभवन येथे सापडलेल्या ब्रिटिशकालीन बंकरमध्ये ‘क्रांती गाथा’ या दालनाची निर्मिती करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या ‘जलभूषण’ या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे देखील उदघाटन व द्वारपूजन केले जाणार आहे. राजभवन येथील ऐतिहासिक श्रीगुंडी मंदिराला देखील प्रथमच पंतप्रधान भेट देणार आहेत.

ADVERTISEMENT

इतिहासकार व लेखक डॉ विक्रम संपत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नागपूर येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या मदतीने ‘क्रांती गाथा’ दालन निर्माण करण्यात आले आहे.

‘क्रांती गाथा’ या दालनामध्ये १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यापासून १९४६ साली मुंबई येथे नौदलात झालेल्या उठावापर्यंतच्या कालावधीतील महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारकांच्या आठवणी जागविण्यात येणार आहेत.

यामध्ये वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, बाळ गंगाधर टिळक, वि. दा. सावरकर, बाबाराव सावरकर, क्रांतिगुरु लहूजी साळवे, अनंत लक्ष्मण कान्हेरे, मॅडम भिकाजी कामा, पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना ‘अभिनव भारत’, ‘पत्री सरकार’, गणेश विष्णू पिंगळे, वासुदेव बळवंत गोगटे, शिवराम राजगुरु यांसह इतर अनेक क्रांतिकारकांचा समावेश असेल.

शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या अनेक आदिवासी क्रांतिकारकांची छायाचित्रे व माहिती देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. दालनाच्या पुढील टप्प्यात आणखी काही क्रांतिकारकांची माहिती दिली जाणार आहे.

ब्रिटिश राजवटीविरुद्ध महाराष्ट्रातून, त्यावेळच्या मुंबई राज्यातून दिल्या गेलेल्या सशस्त्र लढ्याची गाथा या ठिकाणी शिल्पे, दुर्मिळ छायाचित्रे व भित्तिचित्रे यांच्या माध्यमातून दाखविली जाणार आहे. राज्य पुराभिलेख विभाग, एशियाटिक सोसायटी, केसरी पुराभिलेख व मुंबईतील सावरकर संग्रहालयातून यासाठी माहिती मिळविली आहे. या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखील देखावा निर्माण करण्यात आला आहे.

१६ ऑगस्ट २०१६ रोजी राजभवनातील हिरवळीखाली भव्य ब्रिटीश कालीन बंकर असल्याचे तत्कालीन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना आढळले. त्यानंतर लगेचच त्यांनी बंकरची पाहणी करून त्याचे जतन करण्याचे आदेश दिले होते.

पहिल्या महायुद्धापूर्वी बांधण्यात आलेल्या या बंकरची वास्तू अनेक वर्षे बंदिस्त असल्यामुळे दुर्लक्षित अवस्थेत होती. सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे वास्तू स्थापत्य दृष्टीने असुरक्षित झाली होती.

ही ऐतिहासिक वास्तू राजभवनाचा वारसा असल्यामुळे तसेच तिचे वरील बाजूस राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेली ‘जलभूषण’ ही वास्तू उभी असल्यामुळे राज्यपालांच्या सुरक्षेशी तडजोड न करता बंकरचे संवर्धन करणे आवश्यक होते.

या दृष्टीने भूमिगत बंकरच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडीट केले गेले व नंतर तिचे बळकटीकरण करण्यात आले. या बंकरमध्ये विविध आकारांचे १३ कक्ष असून बंकरच्या सुरुवातीला २० फूट उंच भव्य प्रवेशव्दार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रदीर्घ उतार (Ramp) आहे.

बंकरचा शोध लागला त्यावेळी त्यातील कक्षांना ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार (Cartridge Store), शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसुन आली होती. बंकरमध्ये पाण्याच्या निचऱ्याची तसेच शुध्द हवा व नैसर्गिक प्रकाशाची योग्य व्यवस्था असल्याचे आढळले. बंकरमध्ये जागोजागी दिव्यांसाठी जागा (Lamp Recess) ठेवण्यात आल्या होत्या. बंकरचे संवर्धन करताना तसेच आता त्या ठीकाणी क्रांतिकारकांचे दालन करताना सर्व मूळ वैशिष्टे जतन करण्याची काळजी घेण्यात आली आहे.

१८ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या बंकरमध्ये आभासी वास्तवतादर्शक संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र एकूण १३ कक्ष असलेल्या बंकरमधील अनेक कक्ष रिकामे होते. ‘क्रांती गाथा’ दालनासाठी यातील अनेक कक्षांचा तसेच मार्गीकेतील भिंतीचा उपयोग करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT