नागपूरवरुन फोन, सदावर्तेंना आलेला तो मेसेज आणि…जाणून घ्या आज कोर्टात काय घडलं?

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद अजुनही राज्यभर उमटत आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. आज झालेल्या सुनावणीत गिरगाव कोर्टाने सदावर्ते यांची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढवली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गामदेवी पोलीस ठाण्याने पवारांच्या घरावर झालेला हल्ला आणि आंदोलनाचा कट कसा रचण्यात आला यासंबंधीचे काही पुरावे मिळाल्याचं कोर्टासमोर सांगितलं.

ADVERTISEMENT

गुणरत्न सदावर्ते यांच्याव्यतिरीक्त पोलिसांनी 110 कर्मचाऱ्यांना अटक केली असून या कर्मचाऱ्यांपैकी मोहम्मद ताजिउद्दीन शेख, कृष्णकांत कोरे, सविता पवार आणि अभिषेक पाटील या चार कर्मचाऱ्यांची कस्टडी पोलिसांनी मागितली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितल्याप्रमाणे अभिषेक पाटील याने कर्मचाऱ्यांना पवार यांचं घर दाखवलं. या प्रकरणात आणखी एक आरोपीचा शोध पोलीस घेत असून त्यांचं नाव चंद्रकांत सूर्यवंशी असं आहे. तो MJT Marathi YouTube Channel चालवतो आणि तो देखील या कटाचा सहभाग असल्याचं सरकारी वकीलांनी कोर्टासमोर सांगितलं.

पत्रकार पाठवा आणि नागपूरवरुन सदावर्तेंना आलेला तो फोन –

हे वाचलं का?

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टासमोर दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनाच्या दिवशी सकाळी 10 वाजून 33 मिनीटांनी सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांना आंदोलनाबद्दल माहिती दिली. यानंतर त्यांना नागपूरवरुन एक फोन आला. सदावर्तेंच्या मोबाईलवर एक मेसेज आला, ज्यात त्यांना पत्रकार पाठवा असा संदेश देण्यात आला. हा आंदोलनाला आर्थिक सहाय्य कुठून मिळालं याचा तपास करण्यासाठी सदावर्तेंची कस्टडी मिळणं गरजेचं आहे. सदावर्ते म्हणतात की त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून त्यांची बाजू मांडण्यासाठीचे पैसे घेतले नाहीत. परंतू प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 550 रुपये गोळा करण्यात आले जी रक्कम 1 कोटी 80 लाखांच्या घरात गेली. त्यामुळे या पैशांचा वापर कसा झाला याचाही तपास होणं गरजेचं असल्याचं घरत यांनी कोर्टासमोर सांगितलं.

सदावर्ते यांनी 31 मार्च 2022 पासून आपल्या मोबाईलवरचा डेटा उडवलेला आहे. याचा अर्थ त्यांचा या प्रकरणात सहभाग आहे असाच होतो. या प्रकरणातील आणखी एक आरोपी मोहम्मद ताजीउद्दीन शेख याच्या मोबाईलमध्ये एक बॅनर मिळालं आहे ज्यात सावधान शरद पवार असा मेसेज लिहीलेला दिसतो आहे. या बॅनरवर सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीचा फोटो असल्याचं सरकारी वकीलांनी कोर्टासमोर सांगितलं.

ADVERTISEMENT

बचाव पक्षाचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी हे आरोप फेटाळले. “ कर्मचाऱ्यांना माहिती आहे की मी सर्विस प्रोवाईडर आहे. या देशात हे नेमकं चाललंय तरी काय? कर्मचाऱ्यांकडून 1 कोटी 80 लाख रुपये गोळा केले हे सरकारी पक्षाचं म्हणणं आहे. काही क्षणांसाठी असा विचार करु की सदावर्ते यांनी खरंच पैसे घेतले आहेत. पण ज्या लोकांनी हे पैसे दिले आहेत त्यांची काही तक्रार आहे का? जी लोकं या प्रकरणात त्रास भोगत आहेत, आत्महत्या करत आहेत त्यांच्याप्रती आपण जरा संवेदना ठेवूयात. ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला असं पोलिसांचं म्हणणं आहे तिकडे कोणत्याही प्रकारे मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे जर नुकसान झालेलं नसेल तर हे सेक्शन्स लावण्याचं कारणच नाही. सदावर्ते हे आत असले किंवा बाहेर असले तरीही या प्रकरणाचा तपास सुरु राहू शकतो.”

ADVERTISEMENT

दोन्ही बाजूंकडचा हा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने सदावर्तेंच्या कस्टडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. दररम्यान सातारा पोलिसांनीही या प्रकरणात वकील सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा ताबा मिळावा यासाठी सातारा पोलिसांनी कोर्टासमोर अर्ज केला असून या अर्जावरही 13 तारखेला सुनावणी होणार असल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT