सांगली : कोविड चाचणी न करताच घरावर लावला फलक, महापालिकेचा अजब कारभार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सांगलीत जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. परंतू एकीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कामगिरीचा फटका नागरिकांना बसताना दिसतोय. मिरज येथील संजय पाटील यांच्या घराबाहेर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोविड प्रतिबंधित क्षेत्र असा फलक लावला. महत्वाची गोष्ट म्हणजे संजय पाटील यांनी आपली कोविड चाचणीच केली नव्हती तरीही महापालिकेने लावलेल्या या फलकामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ADVERTISEMENT

संजय पाटील हे मिरज येथील बेठेलनगर परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घराबाहेर महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी कोविड प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावला. यावेळी संजय पाटील यांनी मी कोविडची टेस्टच केली नाही तर रिपोर्ट पॉजिटीव्ह कसा आला असं विचारत अधिकाऱ्यांकडे रिपोर्टची मागणी केली. ज्यावर अधिकाऱ्यांनी महापालिकेत जाऊन रिपोर्ट घ्या असं उडवाउडवीचं उत्तर दिलं. सरकारी कामात हस्तक्षेप नको म्हणून संजय पाटील यांनी त्यावेळी शांत राहून पोलिसांत याविरोधात तक्रार नोंदवण्याचं ठरवलं.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संजय पाटील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले, परंतू पोलीसांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेतली नाही. दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या या बोर्डामुळे पाटील कुटुंबाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. संजय पाटील यांच्या घरात त्यांची आई देखील असून त्यांचं वय हे १०५ वर्ष आहे. आपल्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं ऐकताच भीतीने त्यांनी अन्नपाणी सोडल्याचं संजय पाटील यांनी मुंबई तक शी बोलताना सांगितलं. त्यामुळे आपल्या आईला काही झाल्यास त्याला महापालिका प्रशासन जबाबदार असेल असं पाटील यांनी सांगितलं. आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही तर महापालिकेत आत्मदहन करेन असा इशारा संजय पाटील यांनी दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT