Surat Diamond Bourse: ‘मुंबईतून एकही उद्योग सुरतेत गेला नाही’, चित्रा वाघांचा दावा; सुळेंना काय दिलं उत्तर?
Mumbai Diamond Business: ‘सुरत हे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, तर मुंबई हे एक्सपोर्ट हब. या मुंबईच्या हबमधून एकही उद्योग सुरतेत गेलेला नाही.’ असा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Diamond Business Chitra Wagh vs Supriya Sule: मुंबई: गुजरातमधील (Gujarat) सुरतच्या (Surat) हिरे व्यापाऱ्यांनी तब्बल 3400 कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय (Diamond Business) केंद्र तयार केले आहे. जे Surat Diamond Bourse नावाने ओळखले जात आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे मुंबईत असणारा हिरे व्यवसाय आता सूरतमध्ये म्हणजेच गुजरातमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील अनेक हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय स्थलांतरित देखील केल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील अनेक नेत्यांनी सरकारवर टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी देखील याच विषयावरून शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र, या टीकेला आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (surat diamond bourse not a single diamond Business has gone to surat from mumbai claims bjp leader chitra wagh what was answer to supriya sule)
ADVERTISEMENT
‘मुंबईच्या हबमधून एकही उद्योग सुरतेत गेलेला नाही.’ असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. एक्स (टविटर) वर पोस्ट शेअर करत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
‘हिरे व्यापार सुरतेत गेला नाही..’, चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या
महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, सुप्रिया सुळे… कितीही हा महाराष्ट्रद्रोहीपणा आणि करंटेपणा… आपल्याच राज्याची प्रगती तुम्हाला सहन होत नाही का हो..??
कधी आयएसआय फंडेड वेबसाईटची माहिती सांगत महाराष्ट्रात विद्वेष पसरल्याचे सांगता, तर कधी महाराष्ट्रात उद्योग येऊनही उद्योग बाहेर चालल्याचा कांगावा पिटता.. महाराष्ट्राची तत्काळ माफी मागा आणि हा महाराष्ट्रद्रोहीपणा थांबवा..!
तुम्ही आणि तुमचे नेते यांना आता दिशाभूल करण्याशिवाय कोणतेच काम राहिले नाही. कंत्राटी भरतीवर बुरखा फाटल्यानंतर आता असेच नवीन विषय शोधत रहा आणि तुम्ही फक्त तेच काम करीत रहा.
ऐका डायमंड बुर्सची संपूर्ण कहाणी…
सुरत डायमंड बुर्स तयार होते आहे हे खरे आहे. पण, सुरत डायमंड बुर्स आणि मुंबईत असलेला भारत डायमंड बुर्स या दोन्हीच्या कार्यपद्धतीत फरक आहे.
सुरत हे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, तर मुंबई हे एक्सपोर्ट हब. या मुंबईच्या हबमधून एकही उद्योग सुरतेत गेलेला नाही.
आता कान उघडे ठेऊन ऐका… इतके वर्ष तुम्ही महाराष्ट्रावर राज्य केले, तेव्हा हा भारत डायमंड बुर्स ऑपेरा हाऊसमधल्या 5-6 इमारतीत विखुरला होता. आता तो आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वात बीकेसीत एका ठिकाणी आहे. आता या उद्योगाला देवेंद्रजींनी महापेत 20 एकर जागा दिली आणि आशियातील सर्वांत मोठा ‘जेम्स अँड ज्वेलरी पार्क’ तेथे उभा राहतोय.
या पार्कसाठी 5 एफएसआय, वीजदरात सवलत, जीएसटीतून दिलासा असे अनेक निर्णय घेतले ते देवेंद्र फडणवीस यांनीच. उद्योग टिकवायला काय करावे लागते ते फक्त देवेंद्रजींनाच ठावूक. ते तुमच्या तर ठायी सुद्धा नाही.
तुमची स्मरणशक्ती कमी झाली असेल तर मलबार गोल्डची गेल्याच आठवड्यात 1700 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. तनिष्क सुद्धा डायमंड क्षेत्रात गुंतवणूक करते आहे आणि तुर्की डायमंड बुर्स सुद्धा मुंबईत येतो आहे.
मोठ्ठ्या ताई, महाराष्ट्राची माफी मागाच आणि कृपा करुन महाराष्ट्रद्रोहीपणा करु नका..!
अशी पोस्ट शेअर करत चित्रा वाघ यांनी असा दावा केला आहे की, सुरत डायमंड बुर्समुळे मुंबईतील कोणताही हिरे व्यवसाय हा सुरतला गेलेला नाही.
आता चित्रा वाघ यांच्या दाव्यावर विरोधक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, @supriya_sule
कितीही हा महाराष्ट्रद्रोहीपणा आणि करंटेपणा….
आपल्याच राज्याची प्रगती तुम्हाला सहन होत नाही का हो..??
कधी आयएसआय फंडेड वेबसाईटची माहिती सांगत महाराष्ट्रात विद्वेष पसरल्याचे सांगता, तर कधी महाराष्ट्रात उद्योग येऊनही उद्योग बाहेर…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 27, 2023
Surat Diamond Bourse आहे तरी काय?
सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी तब्बल 3400 कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र तयार केले आहे. सुरत डायमंड बोर्स नावाच्या या डायमंड हबला जगातील सर्वात मोठ्या इमारतीचा किताब देखील मिळाला आहे, जे आतापर्यंत पेंटागॉन बिल्डिंगकडे होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Surat Diamond Bourse: गुजराती व्यापाऱ्यांचा मुंबईला प्रचंड मोठा धक्का, ‘हिरा’ व्यापार हिरावला!
वर्षानुवर्षे सुरत शहराला डायमंड सिटी म्हटले जाते. सुरत शहरातील हिरे कारखान्यांमध्ये पैलू पाडलेले हिरे देशातील आणि जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जातात. या हिऱ्यांचा व्यवसाय लाखो लोकांना रोजगार देतो. सुरतच्या हिरे कारखान्यांमध्ये पैलू पाडलेले हिरे जगातील विविध देशांमध्ये पाठवण्यासाठी मुंबईचा वापर केला जातो. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांना मुंबईत स्वतंत्र कार्यालय सुरू करावे लागायचं. ज्याद्वारे सुरतमधील हिरे मुंबईतून जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जात होते.
ADVERTISEMENT
मात्र, आता असे होणार नाही, कारण गुजरातमधील सुरत येथे बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या डायमंड हब इमारतीमध्ये सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. त्यामुळेच आता मुंबईतून जगभरात हिऱ्यांचा व्यवसाय करणारे सुरतचे हिरे व्यापारी मुंबईतून आपला हिरा व्यवसाय बंद करून सुरतला स्थलांतरित होत आहेत.
उद्योगपती मुंबई सोडून सुरतला स्थलांतरित?
सुरत डायमंड असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सूरत डायमंड बोर्सचे समिती सदस्य दिनेश नावडिया यांनी सांगितले की, सरकारने जाहीर केलेल्या सूरतच्या खजोद परिसरात ड्रीम सिटी प्रकल्पाच्या 67 लाख चौरस फूट जागेवर प्रत्येकी 14 मजल्यांचे 9 टॉवर्स बांधण्यात आले आहेत. या टॉवर्समध्ये विविध हिरे कंपन्यांची 4300 कार्यालये आहेत. इमारती तयार होण्यापूर्वीच ही कार्यालये हिरे व्यापाऱ्यांनी विकत घेतली होती. हा सुरत डायमंड बुर्स अंदाजे 3400 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आली आहेत. सुरत आणि मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना एकाच छताखाली आणता यावे म्हणून हिरे व्यापाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जास्त किंमत देऊन सरकारकडून येथे जमिनी खरेदी केल्या होत्या.
हे ही वाचा >> …तर मी नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात टाकेन -प्रकाश आंबेडकर
दिनेश नावडिया म्हणाले की, आतापर्यंत जगातील विविध देशांमध्ये हिरे पाठवण्यासाठी सुरतच्या व्यावसायिकांना मुंबईत स्वतंत्र कार्यालयीन कर्मचारी ठेवावे लागत होते, कार्यालय उघडावे लागत होते आणि आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे त्यांना मुंबईतूनच व्यवसाय करावा लागत होता. पण आता सुरत डायमंड बोर्समध्ये हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. जगातील सर्वात मोठे कस्टम हाउस तयार आहे. आता सुरत विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू होणार असून, त्यामुळे आता सुरतचे हिरे व्यापारी मुंबईऐवजी सुरतमधून जगभरातील हिऱ्यांचा व्यवसाय करू शकणार आहेत.
दिनेश नावडिया यांनी सांगितले की, सुरत डायमंड बोर्स सुरू झाल्यामुळे सुरतच्या रिअल इस्टेटलाही मोठा फायदा झाला आहे, कारण मुंबईतून स्थलांतरित होणाऱ्या लोकांना नवीन घराची गरज आहे, त्यामुळे लोक त्यांची घरे खरेदी करत आहेत. याशिवाय शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. शॉपिंग मॉल्समध्ये खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सूरत डायमंड बुर्स सुरू झाल्यामुळे सुरतच्या प्रत्येक भागातील लोकांना फायदा होईल. याशिवाय जवळपास 1 लाख लोकांना एकाच छताखाली रोजगारही मिळणार आहे. सूरत डायमंड बाजार उघडल्यानंतर, मुंबईतील हिरे व्यवसायाशी संबंधित सुमारे 1000 कार्यालये कायमची बंद होतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT