IND vs WI 3rd ODI : भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा; दणदणीत विजयासह मालिका टाकली खिशात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने एकदिवसीय मालिका खिशात टाकली. तिन्ही सामने जिंकत भारताने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ९६ धावांनी धुव्वा उडवला आणि मालिका ३-० अशा फरकाने जिंकली.

पहिले दोन सामने जिंकत २-० अशी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात विजयाची पुनरावृत्ती केली. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताची सुरुवात निराशाजनक झाली. ४२ धावांवरच भारताचे तीन खेळाडू बाद झाले होते. रोहित शर्मा १३ धावा करून बाद झाला. तर त्यापाठोपाठ विराट कोहली एकही धाव न करता तंबूत परतला. शिखर धवनही १० धावांवर बाद झाला.

४२ धावांवरच तीन महत्त्वाचे फलंदाज बाद झालेले असताना श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतने सावध खेळी करत डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. ऋषभ पंतने ५४ चेंडूत ५६ धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने १११ चेंडूत ८० धावा केल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर अष्टपैलू दीपक चहरने ३८ चेंडूत ३८ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनेही ३४ चेंडूत ३३ धावा करत भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास हातभार लावला. दीपक चहर आणि सुंदरने ५३ धावांची भागीदारी केली.

२६५ धावांचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच वेस्ट इंडिजला धक्के दिले. त्यातून अखेरपर्यंत इंडिजचा डाव सावरला नाही. वेस्ट इंडिजचे अवघ्या २५ धावांमध्येच तीन खेळाडू बाद झाले होते.

ADVERTISEMENT

वेस्ट इंडिजने १०० धावसंख्या गाठेपर्यंत ७ खेळाडू तंबूत परतले होते. १६९ वर वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ बाद झाला. ३७.१ षटकात इंडिजला १६९ धावांपर्यंत मजल मारता आली आणि भारताने तिसरा एकदिवसीय सामना ९६ धावांनी जिंकला.

ADVERTISEMENT

ओडीन स्मिथ (३६ धावा) आणि कर्णधार निकोलस पूरन (३४ धावा) यांनी वेस्ट इंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपयशी ठरले. भारताकडून प्रसिद्ध श्रीकृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. दीपक चहर आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ बळी घेतले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT