संजय राऊतांना धमकी देणारा सापडला, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

विक्रांत चौहान

01 Apr 2023 (अपडेटेड: 01 Apr 2023, 12:02 PM)

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार शनिवारी समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

sanjay raut life threat case police detain youth from pune

sanjay raut life threat case police detain youth from pune

follow google news

दिल्लीत भेट तुला एके 47 ने उडवतो, असा धमकी देणारा मेसेज शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी पाठवला. धमकी देणाऱ्या व्यक्तीने लाँरेन्स बिष्णोईचा उल्लेख केलेला असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणी संजय राऊत यांचे धाकटे भाऊ सुनील राऊत यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. दुसरीकडे आरोपीची ओळख पटली असून, पोलिसांनी पुण्यातून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माध्यमांशी बोलताना दिली. (Sanjay Raut life threat case : Police Detain Youth from Pune)

हे वाचलं का?

संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

संजय राऊत यांना जी धमकी आली आहे, त्यासंदर्भात व्यक्तीची ओळख पटलेली आहे. प्राथमिक रिपोर्ट असे आहे की, दारूच्या नशेत त्याने अशी धमकी दिली आहे. तथापि ही केवळ प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाईल. कुणीही धमकी दिली असेल, तरी कारवाई होईल. महाराष्ट्रात कुणी कुणाला धमकी दिली, तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. अशा कोणत्याही व्यक्तीवर कारवाई होईल.

पुण्यातील तरुणाने दिली संजय राऊतांना धमकी; पोलिसांनी सांगितले नाव

पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी माध्यमांना आरोपीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “व्हॉट्सअपवर मेसेजद्वारे धमकी देण्यात आली. या प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव राहुल उत्तर तळेकर आहे. त्याचे वय 23 वर्ष आहे. तो जालना जिल्ह्याचा मूळ रहिवासी असून, सध्या पुण्यात स्वतःचे हॉटेल चालवतो. त्याची चौकशी केली असता, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे समोर आले.”

हेही वाचा – Pawar कुटुंब कोणाला कधी समजलं नाही अन् समजणारही…, रोहित पवारांचं कोणाला प्रत्युत्तर?

“त्याने संजय राऊतांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क झाला नाही. नंतर मद्य प्राशन केल्यानंतर त्याने हा मेसेज पाठवला. त्याचा लाँरेन्स बिष्णोईशी कोणताही संबंध नाही. त्याने युट्यूबवर व्हिडीओ बघितला आणि त्यामुळे तसा उल्लेख केला. या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली जाईल आणि जे समोर येईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल,” अशी माहिती पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली.

‘दिल्लीत भेट एके 47 नेच उडवतो’, सुनील राऊतांनी तक्रारीत काय म्हटलंय?

संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. तक्रारीत म्हटलं आहे की, “31 मार्च 2023 रोजी रात्री सव्वानऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान एक मेसेज खासदार संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला. व्हॉट्सअपद्वारे लाँरेन्स बिष्णाई या गँगस्टरकडून धमकी मेसेज पाठवण्यात आला.”

संजय राऊतांना आलेला मेसेज

आईबहिणीवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत संजय राऊतांना धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. हिंदू विरोधी, तुला मारून टाकेन. दिल्लीत भेट तू, एके 47 ने उडवतो तुला. मुसेवालासारखे. लाँरेन्सकडून मेसेजे आहे, असं समज. सलमान आणि तू नक्की. तयारी करून ठेव, अशा पद्धतीने संजय राऊत यांना धमकी देण्यात आली आहे.

धमकी देणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कोणती कलमान्वये गुन्हा दाखल केला

सुनील राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून लाँरेन्स बिष्णोईविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 506 (2) (धमकी देणे) आणि 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या आरोपीला 2 वर्ष ते 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते आणि दंडही ठोठावला जातो.

    follow whatsapp