अनिल देशमुख यांच्यासाठी कोट्यवधींची वसुली करत होता सचिन वाझे, ED चा दावा

मुंबई तक

• 09:05 AM • 30 Jun 2021

मुंबईतल्या अँटेलिया प्रकरणात पाच पोलिसांसह एकंदरीत दहा जणांना तुरुंगात जावं लागलं आहे. तीन महिन्यांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट त्यांनी सचिन वाझेला दिलं होतं. तसंच बदल्यांमध्येही ढवळाढवळ करत होते असाही आरोप […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या अँटेलिया प्रकरणात पाच पोलिसांसह एकंदरीत दहा जणांना तुरुंगात जावं लागलं आहे. तीन महिन्यांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट त्यांनी सचिन वाझेला दिलं होतं. तसंच बदल्यांमध्येही ढवळाढवळ करत होते असाही आरोप करण्यात आला होता. आता सचिन वाझे हा अनिल देशमुखांसाठी कोट्यवधींची वसुली करत होता असा दावा ईडीने केला आहे.

हे वाचलं का?

या लेटर बॉम्बनंतर आता या प्रकरणातला हिशोबही समोर येऊ लागला आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. आता तो हिशोब ईडीने समोर आणल्याचा दावा केला आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझेने डिसेंबरपासूनच अनिल देशमुखांसाठी वसुली सुरू केली होती. एवढंच नाही आता ईडीकडून अशाही पोलिसांची चौकशी होते आहे ज्यांच्यावर वसुलीचा आरोप झाला होता. हे सगळेजण अनिल देशमुखांसाठी वसुली करत होते का? याचाही तपास केला जात असल्याचं ईडीने म्हटलं आहे. 20 मार्चला परमबीर सिंग यांनी पत्र लिहिलं होतं. या पत्रात दर महिन्याला बार आणि रेस्तराँच्या मालकांकडून 100 कोटी रूपये वसूल करण्यात यावेत असं अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सांगितलं होतं.

ईडीने आता या संपूर्ण प्रकरणी अशा पोलिसांचीही चौकशी सुरू केली आहे ज्यांच्यावर वसुलीचे आरोप लागले आहेत.ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान सचिन वाझेने अनिल देशमुखांसाठी 4 कोटी 70 लाख रूपये वसूल केले होते.

ईडीने केलेल्या चौकशीत हेदेखील समोर आल्याचं कळतं आहे की परमबीर सिंग यांनी जे पत्र लिहिलं होतं त्यातले आरोप हवेतले आरोप नव्हते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांमधल्या काही अधिकाऱ्यांना डान्सबार मधून वसुली करण्याचे आदेश दिले होते. त्यासंबंधीचं टार्गेटही त्यांना ठरवून देण्यात आलं होतं. ईडीच्या सूत्रांनी हेदेखील म्हटलं आहे की अनिल देशमुख यांनी वसुलीचं टार्गेट दिल्यानंतर सचिन वाझे मुंबईतल्या जवळपास 60 बारच्या संपर्कात होता. तो थेट वसुली करत नव्हता तर जया पुजारी आणि महेश शेट्टी यांच्यासारख्या लोकांकडून तो पैसे गोळा करत होता असंही ईडीच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp