‘महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही’, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं

मुंबई तक

21 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:24 AM)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजत असतानाच कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केलंय. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, असं म्हणत बोम्मईंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं असून, कर्नाटक विधानसभेत त्यांनी ही भूमिका मांडलीये. त्यामुळे सीमावादाच्या प्रश्नाचा पुन्हा भडका उडणार असंच दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजत असतानाच कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केलंय. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, असं म्हणत बोम्मईंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं असून, कर्नाटक विधानसभेत त्यांनी ही भूमिका मांडलीये. त्यामुळे सीमावादाच्या प्रश्नाचा पुन्हा भडका उडणार असंच दिसतंय.

हे वाचलं का?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या वादात केंद्राने मध्यस्थी केली. सीमावाद प्रकरणात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश केंद्राने दिले. हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारला या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न होत असून, सरकारकडूनही यावर भूमिका मांडण्यात आलीये.

दुसरीकडे कर्नाटक विधिमंडळातही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा आला. यासंदर्भात कर्नाटक सरकार ठराव पारित करण्याच्या तयारीत असून, या प्रकरणावर बोलताना कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं की, विधिमंडळाची भूमिका स्पष्ट आहे. कर्नाटकाची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका बोम्मई यांनी मांडलीये.

‘पोलिसांकडून माहिती आलीये’, एकनाथ शिंदे भडकले, विरोधकांना सुनावलं

कर्नाटक विधानसभेत मंगळवारी (20 डिसेंबर) सीमावादावर चर्चा सुरू होती. यावेळी दोन्ही सभागृहांमध्ये एक ठराव मंजूर करण्याची सूचना करण्यात आली. त्यावेळी बोम्मईंनी ही भूमिका मांडली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीबद्दलही सांगितलं. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दोन्ही राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या गेल्या, अशी माहिती बोम्मईंनी सभागृहात दिली.

एकनाथ शिंदेंनी विधानसभेत काय सांगितलं होतं?

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, ‘गृहमंत्र्यांनी त्यांना (कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई) योग्य सूचना, समज दिली. कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारचं कृत्ये, अशा प्रकारची घटना होता कामा नये. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्यांनी (अमित शाह) स्वतः माध्यमांसमोर केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या भूमिकेचं अभिनंदन करायला पाहिजे होतं.’

पुढे एकनाथ शिंदे असंही म्हणाले होते की, ‘आम्ही त्या मुख्यमंत्र्यांना समोरासमोर सांगितलं की, तुम्ही ट्विट करताहेत, ते ट्विट चुकीचं आहे. त्यांनी सांगितलं की, ते ट्विट आमचं नाहीये. त्याचीही माहिती त्यांना मिळाली आहे. त्याची माहिती सभागृहात मिळेल. त्या ट्विटमागे कुठला पक्ष आहे, याचीही माहिती मिळेल.’

CM शिंदेंसाठी फडणवीस आले धावून, विरोधकांच्या आरोपांना दिलं चोख प्रत्युत्तर

एकनाथ शिंदेंनी यांनी विधानसभेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीबद्दल माहिती दिली होती. त्याचबरोबर राजकारण करू नका असंही म्हटलं. मात्र, त्यानंतर बसवराज बोम्मईंनी पुन्हा भूमिकेचा पुर्नरुच्चार केला आहे. त्यामुळे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता वाढलीये.

    follow whatsapp