हर्षदा परब: मुंबईसारख्या काही मेट्रोपोलिटन शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटतेय. तेव्हा नागरीकांना आशा आहे की लॉकडाऊन हटेल. मात्र तज्ञांच्यामते लॉकडाऊन काढला तरी जोवर कोरोनावर पूर्ण मात करता येत नाही तोवर कंटेन्मेंट किंवा मायक्रो कंटेन्मेंट झोनवर भर देण्याची आवश्यकता आहे.
ADVERTISEMENT
राज्यात सुमारे 60 हजारांपेक्षा कोरोना रुग्ण अजूनही आढळताहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतनंतर फेब्रुवारी 2021 च्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसू लागली. मार्च महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या राज्यभरात वाढताना आढळली. रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने कोरोना राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईसारख्या मेट्रोपोलिटन शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. मात्र, ग्रामिण भागामध्ये रुग्णसंख्या वाढतेय. अशा परिस्थितीत लॉकडाऊन हटवणं योग्य होणार नाही असं महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे तांत्रिक सल्लागार असलेले डॉ. सुभाष साळुंखे यांचं मत आहे.
मे महिन्याच्या मध्यापर्यंत रुग्णांची संख्या घटेल असा अंदाज टास्क फोर्सने वर्तवला होता. रुग्णसंख्या घटण्याचा ट्रेंड आणखी एक आठवडा राहीला. तसंच त्यात काही बदल दिसला नाही तर रुग्णसंख्या घटताना दिसेल असंही डॉ. साळुखे यांनी सांगितलं. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्राच्या आरोग्य खात्याने तीन गोष्टींवर भर द्यायला सांगितला आहे. त्यापैकी कोरोना संक्रमण टेस्ट, कंटेन्मेंट झोन आणि व्हॅक्सिनेशन यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
मायक्रो कण्टेन्मेंट झोन किंवा कंटेन्मेंट झोनवर भर दिला पाहिजे
रुग्णसंख्या ओसरायला लागली आणि हा ट्रेण्ड संपूर्ण राज्यात दिसू लागला तर साधारण आठवड्याभरानंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेता येऊ शकतो. मात्र, जोवर कोरोनावर पूर्ण मात केली जात नाही तोवर मायक्रो कण्टेन्मेंट झोन किंवा कटेन्मेंट झोनवर भर देणं गरजेचं आहे. मुंबई किंवा काही शहरांमध्ये कमी होणारी रुग्णसंख्या ही लॉकडाऊनचा परीणाम आहे. लोक बाहेर पडत नाहीत. संसर्ग झालेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलें आहे यामुळे हा परिणाम दिसतोय असं मत डॉ साळुंखे यांनी मांडला. तसंच रुग्णसंख्या कमी झाली तरी साधारण आठवडाभर रुग्णसंख्येवर लक्ष दिलं पाहिजे असं ते पुढे सांगतात. मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या कमी होताना दिसेल असा अंदाज राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सने व्यक्त केल्याची माहिती त्यांनी दिली.
हॉस्पिटलमध्ये किती रुग्णांना दाखल करावं लागतं हे पाहणं महत्त्वाचं
साथ रोग तज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांच्यामते पॉझिटिव्हिटी रेट किंवा फक्त कमी होणारी रुग्णसंख्या यांत होणारी घट लक्षात घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घेता येणार नाही. तर, मृत्यू, संसर्ग यासर्व बाबी लक्षात घेऊन मगच लॉकडाऊनबाबत निर्णय घेणं योग्य ठरेल. पॉझिटिव्हिटी रेटबरोबर रुग्णालयात किती रुग्णांना दाखल करण्याची गरज आहे हे बघणं गरजेचं आहे. जर रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्याची गरज वाढली, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज लागत असेल तरीही नुसती रुग्णसंख्या कमी होते म्हणून निर्णय घेता येणार नाही.
आर नॉट पहावा लागेल
आर नॉट म्हणजे रेप्लिकेशन जास्त आहे. शंभर संसर्गित माणसांपासून किती रुग्णांना संसर्ग होऊ शकतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. 1.2 किंवा 1.3 असेल तर आपण रुग्णसंख्या कमी होईल. पण सध्या राज्याचा आर नॉट जास्त आहे. सध्या 100 रुग्ण हे 160 रुग्णांना संसर्गित करतात. जे प्रमाण जास्त आहे. ते 200 किंवा त्यापेक्षा जास्त झालं तर परिस्थिती वाईट होऊ शकते असं डॉ. साळुंखे यांचं म्हणणं आहे.
60 टक्के व्हॅक्सिनेशन झालं तर शाळा सुरू करण्याचा विचार करता येईल.
यंदाही कोरोना रुग्णांची संख्या पाहता शाळा – कॉलेजेस सुरू करता येणार नाही किंवा ती करु नयेत डॉ. साळुंखे सांगतात. तसंच 60 टक्के लोकांचं व्हॅक्सिनेशन केल्याशिवाय आपल्याला शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेता येणार नाही. जर लसीकरणाचा व्यवस्थित पुरवठा झाला आणि सर्व व्यवस्थित सुरू राहिलं तर जून अखेरीपर्यंत मोठ्या प्रमाणावर लसीकरण करता येईल असं मत डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केलं.
ADVERTISEMENT
